बनावट कागदपत्राद्वारे परस्पर वारसदार बदलून फ्लॅट, मुदत ठेवी, सोन्याचे दागिने घेऊन केली फसवणूक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : ३ भाऊ व ४ बहिणी असलेल्या कुटुंबातील मधल्या भावाला दत्तक दिले होते. त्याला वारसा हक्काने राजस्थानातील मोठी मालमत्ता मिळाली. आजारपणाच्या औषधोपचारासाठी त्याने राजस्थानातील मालमत्ता विकून पुण्यात फ्लॅट घेतला. त्याच्या निधनानंतर मोठ्या भावाने बनावट कागदपत्राद्वारे परस्पर वारसदार बदलून फ्लॅटचा ताबा घेतला. मुदत ठेवी व सोन्याचे दागिने असा ७० लाखांचा ऐवज हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी शिवशंकर भुधरमल दवे (वय ४२, रा. शुक्रवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी मफतलाल भुधरमल दवे (वय ५२, रा. भीनमाल, जालोर, राजस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ९ जुलै ते १० सप्टेंबर २०२४ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे सख्खे भाऊ आहेत. फिर्यादीचे कुटुंब ३ भाऊ व ४ बहिणी असे आहे. त्यामधील मधल्या भावाला – रवींद्रकुमार दवे यांना – आईवडिलांनी नात्यातील मूळ राजस्थानातील गोविंदरामजी दवे यांना दत्तक दिले होते, कारण त्यांना अपत्य नव्हते.
गोविंदरामजी व त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर सर्व मालमत्ता रवींद्रकुमार दवे यांना वारस म्हणून मिळाली. १९९८ मध्ये रवींद्रकुमार दवे यांना फुफ्फुसाचा आजार झाला. गावी उपचार होत नसल्यामुळे त्यांनी राजस्थानमधील सर्व मालमत्ता साधारणतः १ कोटी रुपयांना विकली.
त्यातून गुरुवार पेठेत एक फ्लॅट घेतला. तसेच प्रत्येकी २५ लाख रुपयांच्या दोन मुदत ठेवी वेगवेगळ्या बँकांमध्ये केल्या. फ्लॅटवर वारसदार म्हणून फिर्यादीचे नाव होते, तर मुदत ठेवींसाठी भाचीला वारसदार नेमले होते. या ठेवींच्या व्याजातून रवींद्रकुमार यांचा आजारपणाचा खर्च चालत होता.
९ जुलै २०२४ रोजी रवींद्रकुमार दवे यांचे निधन झाले. त्यानंतर मोठा भाऊ मफतलाल दवे कोणालाही काही न सांगता तातडीने पुण्यात आला. रवींद्रकुमार दवे यांच्या अंत्यविधीनंतर फ्लॅटचे कुलूप तोडून घरातील कागदपत्रे, ४० तोळे सोन्याचे दागिने, मुदत ठेवीच्या पावत्या स्वतःकडे घेतल्या. त्यानंतर दहाव्या दिवशी राजस्थानात सर्वांना हिस्साचे वाटप करणार असल्याचे सांगितले.
सर्व धार्मिक विधी उरकल्यानंतर मफतलाल दवे पुन्हा पुण्यात आला. भाची व बहिणीची दिशाभूल करून त्यांच्या मदतीने पंजाब नॅशनल बँकेतील २५ लाख रुपयांची एफडी स्वतःच्या ताब्यात घेतली. फ्लॅटवर वारसदार म्हणून फिर्यादीचे नाव असूनही इतर भावंडांची फसवणूक करत बनावट वारस प्रमाणपत्र तयार करून १० सप्टेंबर २०२४ रोजी फ्लॅट स्वतःच्या नावावर करून घेतला.
फ्लॅट स्वतःच्या नावावर करून ५० लाखांच्या मुदत ठेवी व २० लाखांचे ४० तोळ्यांचे दागिने असा ७० लाख रुपयांचा ऐवज हडप करून फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप व्हटकर करत आहेत.
