शनिवारवाड्याजवळील प्रेमळ विठ्ठल मंदिर परिसरात भरदिवसा फसवणुकीची घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दर्शनासाठी आलेल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेला ‘जेवण व पैसे वाटप होत आहे’ असे सांगून गळ्यातील सोन्याची पोत काढायला लावून चोरट्यांनी तिची पर्स लांबवली. ही घटना गुरुवारी सकाळी सव्वा अकरा वाजता शनिवारवाड्याजवळील प्रेमळ विठ्ठल मंदिरासमोरील फुटपाथवर घडली.
गणेश पेठेतील दुधभट्टीसमोर राहणाऱ्या ७० वर्षीय महिलेने याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला दर्शनासाठी प्रेमळ विठ्ठल मंदिरात गेल्या होत्या. दर्शनानंतर त्या मंदिरासमोरील फुटपाथवर आल्या असता दोघेजण त्यांच्या जवळ आले.
शनिवारवाडा येथे जेवण व पैसे वाटप सुरू आहे, असे सांगून त्यांनी त्या ठिकाणी जायचा सल्ला दिला. त्याच दरम्यान, गर्दीचा हवाला देत गळ्यातील सोन्याची पोत (किंमत अंदाजे ३५ हजार रुपये) काढून पिशवीत ठेवण्यास सुचवले. महिलेने तसे केल्यावर, त्यांनी “पोत व्यवस्थित ठेवली का?” अशा संवादात तिला गुंतवले आणि तिच्या पिशवीतील पर्स चोरून पसार झाले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे करीत आहेत.
