अंमली पदार्थ विरोधी पथकाची खराडी परिसरातील काळुबाईनगर येथे कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नंबर प्लेट नसलेली मोटारसायकल घेऊन राँग साईटने भरधाव वेगाने पोलिसांसमोरच आलेल्या महाविद्यालयीन तरुणाची झडती घेतली असता, त्याच्याकडे ४ लाख ६३ हजार रुपयांचे मेफेड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ आढळून आला.
हर्षवर्धन राहुल धुमाळ (वय २०, रा. पठारे वस्ती, दुगामार्ता मंदिराजवळ, चंदननगर, खराडी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक खराडी परिसरात पेट्रोलिंग करत असताना काळुबाईनगर परिसरात एक तरुण नंबर प्लेट नसलेली दुचाकी घेऊन भरधाव वेगाने राँग साईटने त्यांच्या दिशेने येताना दिसला.
पोलिसांच्या पथकाने त्याला थांबवून चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे ४ लाख ६३ हजार रुपयांचा २३ ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, १ लाख रुपयांची मोटारसायकल, मोबाईल असा एकूण ६ लाख २३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
त्याच्याविरुद्ध खराडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. हर्षवर्धन धुमाळ हा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, राहुल कोळपे, पोलीस अंमलदार संदीप शिर्के, दयानंद तेलंगे, नागनाथ राख, सचिन माळवे, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, नाणेकर यांनी केली आहे.
