प्रा. संजय बी. चोरडिया यांचे मत; सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचा लंडनच्या रॅडंक्स लिमिटेडसोबत सामंजस्य करार
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे: सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पुणे आणि लंडन (युके) येथील रॅडंक्स लिमिटेड यांच्यात शैक्षणिक व बौद्धिक देवाणघेवाण वाढवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि रॅडंक्स लिमिटेडच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रेनू राज यांनी नुकत्याच या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. प्रसंगी ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, विधी महाविद्यालयाच्या समन्वयक प्रा. केतकी बापट आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “या करारामुळे मध्यस्थी (मेडिएशन) आणि पर्यायी वाद निराकरण या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्याला नवे व्यासपीठ मिळाले आहे. या अंतर्गत रॅडंक्सचा ८० तासांचा ‘मेडिएशन फाउंडेशन ट्रेनिंग कोर्स’ संयुक्त स्वरूपात ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.
यामुळे भविष्यातील मध्यस्थ, कायदेविषयक तज्ज्ञ व शांतिदूत घडवण्यास मदत होणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षण, जागतिक प्रमाणपत्र व व्यावसायिक संधी उपलब्ध होणार असून, भारतीय युवकांना जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त मध्यस्थ आणि ‘पीस लीडर्स’ म्हणून घडवण्याच्या दिशेने हा करार महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.”
रॅडंक्स लिमिटेड ही आंतरराष्ट्रीय स्तरावर सीमापार मध्यस्थी व वाद निराकरण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था आहे. सुसंघटित, नैतिक आणि परिणामकारक प्रशिक्षण पद्धतीसाठी ओळखली जाणारी ही संस्था जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
डॉ. रेनू राज या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त मध्यस्थ असून एसआरए-नोंदणीकृत परदेशी वकील आणि भारतीय संसदेत २०२३ मधील ‘मेडिएशन बिल अमेंडमेंट’ समितीच्या सदस्या आहेत. त्यांनी मध्यस्थीला जीवन बदलणारे साधन म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ‘सूर्यदत्त’तर्फे २०२० मध्ये त्यांना ‘सूर्यदत्त नॅशनल अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स हे बहुविषयक एकात्मिक कॅम्पस असून, शालेय शिक्षणापासून कनिष्ठ महाविद्यालय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट संशोधनापर्यंत विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
व्यवसाय व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान, वाणिज्य, पर्यटन व आतिथ्य व्यवस्थापन, संगणक अनुप्रयोग, इंटिरिअर डिझाइन, फॅशन डिझाइन, इव्हेंट मॅनेजमेंट, मास कम्युनिकेशन, शिक्षण, अॅनिमेशन, कायदा, सायबर सिक्युरिटी, फिजिओथेरपी, फार्मसी, नर्सिंग, फिल्ममेकिंग, ब्युटी अँड वेलनेस, हेल्थ अँड फिटनेस तसेच परफॉर्मिंग आर्ट्स अशा विविध शाखांमध्ये शिक्षण दिले जाते.
“मूल्यवर्धित अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून वैविध्यपूर्ण क्षेत्रातील नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रातील प्रशिक्षणाचा ‘सूर्यदत्त’ने समावेश केला आहे. सध्या जगभर तंटा निवारणात मध्यस्थी हा अतिशय महत्वाचा घटक बनला आहे.
त्यामुळे ‘सूर्यदत्त’मध्येही लवकरच मध्यस्थी या विषयात उद्योगाभिमुख, व्यावहारिक आधारित मूल्यवर्धित अभ्यासक्रम सुरु करत आहोत. सेमिनारमध्ये सहभागी होणार्या सर्व प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आणि न्याय वितरण प्रणालीचा एक भाग व्हावे असे आवाहन प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी केले.
