प्रशासनाकडे मा. आ. राहुल मोटे यांची मागणी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : परांडा विधानसभा मतदारसंघात सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे, जनावरांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांतील (भूम, वाशी व परांडा) सर्व महसूल मंडळांचा अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये समावेश करावा, अशी ठाम मागणी मा. आ. राहुल मोटे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. तरीदेखील प्रशासनाच्या सदोष पर्जन्यमापक यंत्रणेमुळे केवळ वाशी तालुक्यातील काही महसूल मंडळांचा समावेश अतिवृष्टीग्रस्त भागात करण्यात आला असून भूम व परांडा तालुक्यातील इतर महसूल मंडळांचा यात समावेश झालेला नाही.
“पाऊस सर्वत्र मोठ्या प्रमाणावर झाला आहे, नुकसान देखील सर्वत्रच झाले आहे. त्यामुळे परांडा मतदारसंघातील सर्वच महसूल मंडळांचा अतिवृष्टीग्रस्त भागात समावेश करून शेतकऱ्यांना सरसकट व जास्तीत जास्त मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी,” अशी मागणी राहुल मोटे यांनी केली आहे.
