कोंढवा, वानवडीतील दोन टोळ्यांतील ७ गुन्हेगारांचा समावेश
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शस्त्रांचा धाक दाखवून दहशत पसरवणे, दरोडे टाकणे, पिस्तुल बाळगणे, गावठी हातभट्टीची दारू विक्री करणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या लोणी काळभोर, कोंढवा आणि वानवडी परिसरातील १० गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या आदेशाने करण्यात आली.
कोंढवा येथील टोळीप्रमुख करीम सय्यदअली सौदागर ऊर्फ लाला (वय २९, रा. मेट्रो टॉवर, कोंढवा खुर्द) आणि त्याच्या टोळीतील सदस्य शाहरुम रमजान पठाण ऊर्फ फतेह (वय २५, रा. भाग्योदयनगर, कोंढवा), अझहर बशीर शेख (वय ३५, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) व अझहर इरफान शेख ऊर्फ अज्जू (वय २८, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) यांच्या टोळीवर बेकायदा शस्त्रे बाळगणे, दुखापत करणे, धमकावणे, जबरी चोरी करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे एकूण ७ गुन्हे दाखल आहेत. त्यांना २ वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
वानवडीतील टोळीप्रमुख राहुल ऊर्फ विकी रामू परदेशी (वय ३५, रा. वानवडी गाव), विशाल राजू सोनकर (वय २६, रा. वानवडी गाव) आणि सुनिल रामू परदेशी (वय ३०, रा. वानवडी गाव) या तिघांवर मारहाण, गंभीर दुखापत, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, धमकावणे आणि बेकायदा शस्त्र बाळगणे अशा स्वरूपाचे ७ गुन्हे दाखल आहेत. त्यांनाही २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
लोणी काळभोर येथील अनिकेत गुलाब यादव (वय २२, रा. कदमवाकवस्ती) याच्यावर बेकायदेशीर जमाव जमविणे, दरोडे टाकणे, शस्त्र बाळगणे, धमकावणे, जबरी चोरी करणे अशा स्वरूपाचे ५ गुन्हे दाखल आहेत. तसेच लोणी काळभोर येथीलच प्रसाद ऊर्फ बाबु धनाजी सोनवणे (वय २१, रा. नायगाव रोड, थेऊर) याच्यावर बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे आणि दरोड्याची तयारी करणे असे ३ गुन्हे आहेत.
याशिवाय, कोंढवा खुर्द येथील विश्वजीत भिमराव गायकवाड (वय ४०, रा. भिमनगर) याच्यावर बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्याचे ४ गुन्हे आहेत. या तिघांनाही २ वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
११४ गुन्हेगारांवर कठोर कारवाई
जानेवारी २०२५ पासून परिमंडळ ५ कार्यालयाच्या हद्दीत आतापर्यंत १६ सराईत गुन्हेगारांवर एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच १० मोका कारवाईंमधून ६७ गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले असून, ३१ जणांना तडीपार करण्यात आले आहे. एकूण ११४ गुन्हेगारांवर ठोस कारवाई झाल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी सांगितले.
