हरवलेले व चोरीला गेलेले ८ लाखांचे मोबाईल समर्थ पोलिसांनी परत मिळविले
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरवलेले तसेच सायबर गुन्ह्यात चोरीला गेलेले मोबाईल परत मिळविण्यात समर्थ पोलिसांना यश आले आहे. तब्बल ८ लाख रुपये किंमतीचे असे १२ महागडे मोबाईल पोलिसांनी हस्तगत करून तक्रारदारांना परत केले.
पुणे शहर व परिसरात गर्दीच्या ठिकाणांहून मोबाईल चोरीला जातात. त्यातील डेटा नष्ट करून हे मोबाईल महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत तसेच इतर राज्यांत विकले जातात. काही दिवसांनी ते प्रत्यक्ष वापरात आणले जातात. तांत्रिक तपासणीद्वारे हे मोबाईल कोठे वापरले जात आहेत, याचा माग काढता येतो.
केंद्र शासनाच्या सीईआयआर प्रणालीचा वापर करून समर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस अंमलदार सुवर्णा जाधव, अविनाश दरवडे व सुनिता खोमणे यांनी हरवलेल्या व चोरीला गेलेल्या मोबाईलचा डेटा तयार केला. त्यावर तांत्रिक तपास करून वारंवार पाठपुरावा केला.
या तपासात अनेक मोबाईल महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत तसेच इतर राज्यांत वापरात असल्याचे आढळून आले. स्थानिक पोलीस ठाण्यांशी पत्रव्यवहार व संवाद साधून हे मोबाईल हस्तगत करण्यात आले. यानंतर पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या हस्ते हे मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते व पोलीस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे यांच्या सूचनेनुसार सायबर पोलीस पथकातील पोलीस अंमलदार सुवर्णा जाधव, अविनाश दरवडे, सुनिता खोमणे व अर्जुन कुडाळकर यांनी केली.
