रेकॉर्डवरील गुन्हेगाराला वाचविण्यासाठी केली पोलिसांची दिशाभूल : ८ महिन्यांनी अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : चेष्टा-मस्करीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराने फायरिंग केले असताना आणि त्यात स्वतः जखमी झाला असताना गुन्हेगाराला वाचविण्यासाठी पोलिसांची दिशाभूल केली. पोलिसांच्या तपासात खरा प्रकार पुढे आला. तेव्हा तो फरार झाला होता. खुनाचा प्रयत्न केलेल्या गुन्ह्यात फरार झालेल्या या फिर्यादीला पकडण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना तब्बल ८ महिन्यांनी यश आले.
करण भारत गजरमल (वय १९, रा. श्लोक अपार्टमेंट, दभाडी, आंबेगाव बुद्रुक) असे त्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण गजरमल हा जखमी अवस्थेत भारती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता.
तेथे असताना त्याने भारती विद्यापीठ पोलिसांना १६ जानेवारी २०२५ रोजी फिर्याद दिली होती. त्यात त्याने सांगितले की, १५ जानेवारी रोजी रात्री साडेसात वाजता मी, माझा मित्र निलेश उर्फ बब्या संतोष जाधव आणि अक्रम अन्सारी हे मोबाईलवर गेम खेळत बसलो होतो.
रात्री साडेनऊ वाजता माझा व निलेश जाधव यांचा चेष्टा-मस्करीतून वाद झाला. निलेश जाधव याने गावठी कट्टा रोखला असता मी खाली वाकलो. त्यावेळी त्याने फायर केल्याने गोळी माझ्या उजव्या खांद्याला लागली.
मी खाली पडलो. त्याच वेळी माझा मित्र हरी डेरे त्या ठिकाणी आला होता. त्याने आणि अक्रम अन्सारी यांनी मला उचलून उपचारासाठी भारती हॉस्पिटलमध्ये आणून दाखल केले, अशी करण गजरमल याने फिर्याद दिली होती.
त्यावरून पोलिसांनी निलेश जाधव याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. भारती विद्यापीठ पोलिसांनी निलेश जाधव याला पकडून आणले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने आपण गोळीबार केला नसून हरी उर्फ हर्षल डेरे याने गोळीबार केल्याचे सांगितले. पोलिसांनी हर्षल डेरे याला पकडले. तेव्हा समजले की निलेश जाधव नव्हे तर हर्षल डेरे याने गोळीबार केला होता.
हर्षल डेरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्याच्या ऐवजी निलेश जाधव याचे नाव करण गजरमल याने घेतल्याचे निष्पन्न झाले. स्वतः जखमी असताना रेकॉर्डवरील गुन्हेगाराला वाचविण्याचा प्रयत्न करून पोलिसांना खोटी माहिती दिल्याबद्दल करण गजरमल याच्यावर गुन्हा दाखल केला. तेव्हापासून तो फरार होता.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील या आरोपीचा तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनव चौधरी, सागर बोरगे हे शोध घेत असताना करण गजरमल हा गदा चौकाजवळ थांबला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
तेथे जाऊन शोध घेतल्यावर तो मिळून आल्याने करण गजरमल याला १९ ऑगस्ट २०२५ रोजी अटक केली. ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनव चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, संदीप आगळे यांनी केली आहे.















