१२० शिवदीक्षार्थींनी घेतली शिवदीक्षा : श्रीगुरु १०८ वीरूपक्ष शिवाचार्य मानूरकर महाराजांचा आशीर्वचन सोहळा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भुम : नागनाथ देवस्थान मानूर मठ येथे शिवलिंग मूर्तीची पुनःप्राणप्रतिष्ठा व शिवदीक्षा संस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पेठ विभागातील दत्त मंदिरामध्ये झालेल्या या कार्यक्रमात १२० शिवदीक्षार्थींनी विधीवत शिवदीक्षा घेतली.
या प्रसंगी श्रीगुरु ष. ब्र. १०८ वीरूपक्ष शिवाचार्य मानूरकर महाराज यांनी आशीर्वचन देताना सांगितले की, “फक्त देवाचे नाव घेतले, चिंतन केले व स्मरण केले तरी अनेक जन्मांची पापे नाहीशी होतात. देवाच्या नामस्मरणात एवढी मोठी ताकद आहे.
मात्र फक्त नाव घेऊन थांबायचे नसते, भक्ती करताना भक्ताने भक्तीतच देव व्हायचे असते. हाच या दीक्षा संस्काराचा खरा अर्थ आहे.” कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नागनाथ देवस्थान मानूर मठ येथे शिवलिंग मूर्ती पुनःप्राणप्रतिष्ठेने झाली. त्यानंतर दत्त मंदिरामध्ये होम-हवन पार पडले. सर्व शिवदीक्षार्थींनी विधीवत लिंगपूजा करून शिवदीक्षा व शपथ घेतली.
कार्यक्रमाची सांगता गुरु महाराजांच्या आरतीने झाली. या सोहळ्याचे पौराहित्य प्रकाश शास्त्री, ओमप्रकाश स्वामी, मनोज स्वामी, गणेश स्वामी आणि महेश स्वामी यांनी केले. यावेळी उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे व संयोगिता गाढवे यांनी मानूरकर महाराजांचे आशीर्वाद घेतले. तसेच अशोक तोडकर, सिद्धेश्वर मनगिरे, महेश मनगिरे, विजय सोलापूर, ओम स्वामी, पंकज उंबरे, मधुकर शेटे, महेश होनराव, पत्रकार धनंजय शेटे, श्रीकांत नकाते, अरुण क्षीरसागर, संजय होळकर, बाळासाहेब वासकर, मनोज शाहीर, उमेश मनगिरे, अमित होळकर, अनिल तोडकर यांसह समाजबांधव, महिला व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















