आंबेगाव पोलिसांची कामगिरी : ५२ लाखांच्या ७ कार जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : इनोव्हा क्रिस्टा गाडी सर्व्हिसिंग, डेंटिंग व पेंटिंगच्या कामासाठी फिटरकडे दिली असता, त्याने ती परस्पर विकल्यामुळे आंबेगाव पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून ७ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
भूषण उत्तम काळे (वय ३५, रा. नवीन वसाहत, कात्रज गावठाण) असे या फिटरचे नाव आहे. त्याच्याकडून इनोव्हा क्रिस्टा, मारुती वॅगनआर, हुंदाई आय१०, टोयोटा कंपनीची इटॉस लिवा, वॅगनआर, मर्सिडीज, स्विफ्ट डिझायर अशा एकूण ५२ लाखांच्या ७ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत मयुर भानुदास मोडक (वय ३७, रा. धनकवडी गावठाण) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी त्यांची इनोव्हा क्रिस्टा ही गाडी २८ जून रोजी सर्व्हिसिंग, डेंटिंग व पेंटिंगच्या कामासाठी भूषण काळे या फिटरकडे दिली होती. त्याने १० ते १५ दिवस कामाला लागतील, असे सांगितले.
त्यानंतर त्याने परस्पर ही कार सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील जुनोनी गावातील एजंटच्या मध्यस्थीने, कमिशन देऊन कवठे महांकाळ येथील एजंटाकडे उसनवारी पैशाची नोटरी करून, ८ लाख रुपयांना विकली होती.
काळे याला गाडीबाबत विचारले असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. फिर्यादी यांच्या मित्राने त्यांची गाडी सांगली येथे पाहिली. त्यानंतर त्यांनी आंबेगाव पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी भूषण काळे याला अटक करून चौकशी केली.
त्यात त्याने अशा प्रकारे आणखी काही गाड्या विकल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ५२ लाखांच्या ७ गाड्या जप्त केल्या आहेत. ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गजानन चोरमले यांच्या सूचनेप्रमाणे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे, पोलीस अंमलदार रवींद्र चिप्पा, आकाश फासगे, राहुल लवटे व सुभाष मोरे यांनी केली आहे.
आरोपी सराईत गुन्हेगार – भूषण काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकारे त्याने त्याच्याकडे आलेल्या गाड्या परस्पर एजंटामार्फत विकल्या होत्या. त्या आम्ही वेगवेगळ्या ठिकाणांहून जप्त करून आणल्या आहेत. – शरद झिने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आंबेगाव पोलीस ठाणे
