अवैध शस्त्रांविरोधातील मोहिमेत पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. या मोहिमेत १३ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या २० दिवसांत पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे.
या कालावधीत पोलिसांनी ५० पिस्तुले व ७९ जिवंत काडतुसे जप्त केली. यासंदर्भात ४० गुन्हे दाखल करून ४५ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच धारदार घातक शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात ९४ गुन्हे दाखल करून ६६ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून ९१ कोयते, १२ तलवारी, ४ पालघन, ६ सुरे, चाकू, गुप्ती असे मिळून एकूण ११६ घातक हत्यारे जप्त करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेने विशेष कारवाई केली. विशेषतः गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने मोक्यातून सुटलेला आरोपी पवन देवेंद्र बनेटी (वय २४, रा. राजीव गांधी झोपडपट्टी, पिंपळे गुरव, सांगवी) याच्या ताब्यातून २ पिस्तुले व २ जिवंत काडतुसे जप्त केली. तसेच इतर सहा गुन्हेगारांकडूनही अग्निशस्त्रे आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
ही संपूर्ण कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, संदीप आटोळे, डॉ. बापू बांगर, डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शाखेच्या पथकांनी केली.
