बाणेर, कोंढव्यातील घटना : किरकोळ बाचाबाची व दुचाकीचा हॉर्न वाजविल्याचा प्रकार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये कोयत्याने वार करून दोघांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. किरकोळ कारणावरून झालेली बाचाबाची आणि ‘माझ्या एरियात हॉर्न का वाजविला?’ या कारणावरून दोन्ही घटना घडल्या आहेत.
पहिली घटना पाषाणमधील सुतारवाडी परिसरात घडली. वैमनस्यातून एका तरुणावर टोळक्याने तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना मंगळवारी (२ सप्टेंबर) रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी चार अल्पवयीन मुलांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बाणेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ज्ञानेश्वर रखमाजी कडेकर (वय १९, रा. खेडेकर चाळ, सुतारवाडी, पाषाण) यांच्या माहितीनुसार, कडेकर आणि त्याचा मित्र सचिन कटप्पा माने हे मंगळवारी रात्री शिवसेना चौकात जेवण करून थांबले असता, आरोपींच्या टोळक्याने त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. दगडफेकही करण्यात आली. माने पळून गेला असता, आरोपींनी त्याचा पाठलाग करून कोयत्याने वार केले.
या हल्ल्यात माने जखमी झाला आहे. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून, सहायक पोलीस निरीक्षक सानपे पुढील तपास करत आहेत. दुसरी घटना कोंढव्यातील येवलेवाडी परिसरात घडली. महादेव बभ्रुवान टोम्पे (वय ४१, रा. भराडे वस्ती, येवलेवाडी) हे जखमी झाले असून, त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, सागर बिनावट (रा. श्रद्धानगर, कोंढवा) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास टोम्पे दुचाकीवरून निघाले असता, बिनावट याने ‘माझ्या एरियात हॉर्न कसा वाजवला?’ असे म्हणत त्यांच्यावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक थोरात करत आहेत.
