विवाहितेच्या छळाच्या गुन्ह्यात मागितली होती १ लाखांची लाच : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सासरी होणाऱ्या छळाच्या गुन्ह्यात पीडित महिलेच्या बाजूने उभे राहण्याऐवजी महिला पोलीसच आरोपींना पैशांसाठी मदत करीत असल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपींना अटक न करता जामीन मिळवून देण्यासाठी १ लाखांची लाच मागून, तडजोडीनंतर २० हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून महिला हवालदाराला पकडले.
अंजना विभीषण नागरगोजे (वय ३८, रा. निर्मिती विहार सोसायटी, रुई, ता. बारामती) असे या महिला हवालदाराचे नाव आहे. तक्रारदार व त्यांची पत्नी, सासू, सासरे व मेहुणा यांच्या विरोधात त्यांच्या मेहुण्याच्या पत्नीने बारामती तालुका पोलीस ठाण्यात कौटुंबिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता.
त्याचा तपास महिला हवालदार अंजना नागरगोजे यांच्याकडे दिला होता. तक्रारदार व त्यांचे इतर तीन नातेवाईक यांना जामीन मिळवून देऊन अटक न करण्यासाठी अंजना नागरगोजे हिने तक्रारदाराकडे १ लाख रुपयांची मागणी केली होती.
तडजोडीनंतर तक्रारदार व त्यांची पत्नी, सासू-सासरे यांच्यासाठी प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे २० हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार ९ सप्टेंबर रोजी मिळाली. त्याअनुषंगाने १० सप्टेंबर रोजी बारामती येथे समक्ष भेटून पडताळणी केली असता, अंजना नागरगोजे हिने २० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये २० हजार रुपयांची लाच घेताना अंजना नागरगोजे हिला सापळा रचून पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक सर्वदा सावळे तपास करीत आहेत.
