आयुष कोमकर खून प्रकरण : आंदेकर टोळीवर तिसऱ्यांदा मोक्का कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : नाना पेठेतील टोळीयुद्ध आणि गृहकलहातून आयुष कोमकर याचा खून करणाऱ्या टोळीप्रमुख बंडू आंदेकर याच्यासह १३ साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणारा आयुष कोमकर हा बंडू आंदेकर याचा नातू होता. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी या खून प्रकरणातील प्रमुख सूत्रधार व जावई गणेश कोमकर याचा आयुष हा मुलगा होता. या खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ८ जणांना अटक केली आहे.
आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा राणोजी आंदेकर (वय ७०), आंदेकर याचा नातू तुषार निलंजय वाडेकर (वय २७), स्वराज निलंजय वाडेकर (वय २३), विवाहित मुलगी वृंदावनी निलंजय वाडेकर (वय ४०), तसेच अमन युसूफ पठाण उर्फ खान (वय २५, सर्व रा. नाना पेठ), सुजल राहुल मेरगू (वय २०, रा. आंध्र झार आळी, कामगार मैदान, भवानी पेठ) यांना पोलिसांनी पकडले होते.
अमित प्रकाश पाटोळे (वय १९) आणि यश सिद्धेश्वर पाटील (वय १९) यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. कृष्णराज उर्फ कृष्णा बंडू आंदेकर (वय ४०), शिवम उदयकांत आंदेकर (वय ३१), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१) आणि शिवराज उदयकांत आंदेकर (वय २०, सर्व रा. नाना पेठ) हे फरार असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
आंदेकर टोळीतील हल्लेखोरांनी ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता आयुष कोमकर याचा घराच्या खालील पार्किंगमध्ये १२ गोळ्या झाडून निर्घृण खून केला. सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याने आपल्या अधिपत्याखाली प्रत्येक गुन्ह्यात सामाईक साथीदार व नवीन साथीदारांना सोबत घेऊन कट रचून खून केले आहेत.
तसेच आरोपींवर जीवे ठार मारणे, प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करून तोडफोड करणे, बेकायदेशीर शस्त्रे जवळ बाळगणे, अपहरण करणे, जबरी चोरी करणे, दहशत निर्माण करणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये वारंवार सहभाग आढळून आला आहे.
त्यामुळे समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार करून पोलीस उपायुक्त कृषिकेश रावळे यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांना सादर केला. राजेश बनसोडे यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून मोक्का कारवाईचे आदेश दिले.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, कृषिकेश रावळे, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक चेतन मोरे व गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
आंदेकर टोळीच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई – आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर तसेच त्याच्या साथीदारांनी दहशतीच्या बळावर बेकायदा बांधकामे केली आहेत. तसेच बेकायदा मालमत्तांचे ताबे घेतल्याचा संशय आहे. या बांधकामांवर कारवाई करून टोळीची आर्थिक रसद कमी करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. याबाबत पोलिसांकडून महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.
आंदेकर यांच्या घराची झाडाझडती – बंडू आंदेकर यांच्या नाना पेठेतील घराची गुन्हे शाखा व समर्थ पोलिसांनी बुधवारी रात्री झाडाझडती घेतली. या वेळी खूनाच्या नियोजनासंदर्भात काही पुरावे तसेच आरोपींचे मोबाईल शोधण्यासाठी ही झाडाझडती घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
