सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक कार्याचा सन्मान
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
आळंदी : आळंदी येथे अखिल भारतीय मराठा महासंघ व जगद्गुरु तुकाराम महाराज सामाजिक-आध्यात्मिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. जगन्नाथ सिताराम शेंडगे पाटील यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त व महासंघाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्यात महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे राज्य कार्यकारिणी सदस्य व श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित सुरेश वडगांवकर आणि भाजप अध्यात्मिक आघाडी (पश्चिम विभाग) चे संजयजी घुंडरे पाटील यांना “मराठा भूषण पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प. निलेश महाराज लोंढे कबीरबुवा, संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब मोरे, बंकट स्वामी संस्थानचे ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे तसेच मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन हा सन्मान करण्यात आला. संजय घुंडरे यांचा पुरस्कार त्यांच्या वतीने बाबूलाल घुंडरे यांनी स्वीकारला.
प्रास्ताविकात भगवान शेंडगे यांनी अजित वडगांवकर यांचे शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील २५ वर्षांचे कार्य अधोरेखित केले. ह.भ.प. बापूसाहेब मोरे यांनी “मराठा समाज जात-पातीतून वरचा आहे, म्हणूनच जैन-मारवाडी समाजातील व्यक्तीलाही सन्मान मिळतो,” असे नमूद केले.
ह.भ.प. निलेश महाराज लोंढे यांनी मराठा महासंघाच्या सर्वसमावेशक कार्याचा गौरव केला. सन्मान स्वीकारताना अजित वडगांवकर म्हणाले, “हा पुरस्कार आमच्यावर अधिक जबाबदारी टाकतो. संत ज्ञानेश्वर माऊलींची सेवा ही आमची सततची बांधिलकी आहे.”
दिलीपदादा जगताप यांनी अध्यक्षीय भाषणात “महासंघ जाती-धर्माच्या पलीकडे कार्य करतो, हा आदर्श राजकारणालाही दिशादर्शक आहे,” असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. प्रमोद महाराज काळे यांनी केले. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली.
