रांजणगावातील आयुषची लुधियाना येथून सुटका : अपहरण करणाऱ्या दाम्पत्याला अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पती-पत्नी दोघेही नोकरीला जात असतील तर अनेकदा ते आपल्या लहान मुलांना पाळणाघरात ठेवतात किंवा शेजारी-परिचितांकडे सांभाळण्यासाठी देतात. मात्र, अशा वेळेस मुलगा/मुलगी सांभाळणाऱ्यांना लळा लागणे स्वाभाविक आहे. त्यातच जर त्या व्यक्तीस अपत्य नसेल, तर गंभीर परिणाम घडू शकतात. असाच प्रकार रांजणगाव एमआयडीसी परिसरातील कारेगाव येथे घडला.
येथील एका महिलेनं आपल्या तीन वर्षीय मुलाला शेजारी राहणाऱ्या बिहारी दाम्पत्याकडे सांभाळण्यासाठी दिलं होतं. त्या दाम्पत्याला मुलाचा एवढा लळा लागला की, त्यांनी त्याचे अपहरण करून तो मुलगा घेऊन पळ काढला. पोलिसांच्या कसोशीच्या प्रयत्नांनंतर लुधियाना येथे त्या मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली असून अपहरण करणाऱ्या दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्यांची नावे पुजादेवी ऊर्फ वनिता अर्जुन यादव (३७) आणि अर्जुनकुमार वकिलकुमार यादव (३६, मूळ रा. लोआलगान, चौसा, मधेपुरा, बिहार; सध्या रा. रांजणगाव) अशी आहेत. काजल महेंद्र पडघाण (रा. जुमडा, जि. वाशिम) आपल्या भाऊ प्रमोद पाटील आणि मुलगा आयुष (३) याच्यासोबत कारेगाव येथे राहतात.
त्याच इमारतीत गेल्या ८-१० महिन्यांपासून हे यादव दाम्पत्य भाड्याने राहत होते. काजल पडघाण कामावर जात असल्याने त्या आपला मुलगा आयुष याला शेजारी राहणाऱ्या पुजादेवी यांच्याकडे सांभाळण्यासाठी देत होत्या.
१२ सप्टेंबर रोजीही काजल यांनी नेहमीप्रमाणे आयुषला पुजादेवींकडे दिले. मात्र सायंकाळी घरी परतल्यावर ना पुजादेवी, ना अर्जुन यादव आणि ना आयुष तिथे आढळून आले. मोबाईलही बंद लागत असल्याने शोधाशोध केली, पण काहीच निष्पन्न झाले नाही. दोन दिवस वाट पाहून त्यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
ही बाब गंभीर असल्याने पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांना माहिती दिली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे हे दाम्पत्य लुधियाना येथे असल्याचे समोर आले.
त्यासाठी पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात व सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे यांना लुधियाना येथे पाठवण्यात आले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने १७ सप्टेंबर रोजी दोघांना पकडण्यात आले व आयुषची सुखरूप सुटका करण्यात आली.
चौकशीत यादव दाम्पत्याने कबुली दिली की, काजल पडघाण यांच्या मुलाचा त्यांना प्रचंड लळा लागला होता. स्वतःला मुलबाळ नसल्यामुळे त्यांनी आयुषचे अपहरण केल्याचे सांगितले.
सात दिवसांनंतर आपल्या मुलाला पाहताच काजल पडघाण यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू अनावर झाले. स्थानिकांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक करून त्यांचे आभार मानले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस अंमलदार उमेश कुतवळ, विजय सरजिने, सायबर पोलिस ठाण्याचे अंमलदार संकेत जाधव, लुधियाना पोलिस निरीक्षक सुरेशकुमार रामल (काउंटर इंटेलिजन्स), गुरमित सिंग (देरसी पोलीस ठाणे) व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण करत आहेत.
