अपाची गाडी न दिल्याने पती करत होता छळ : लोणीकंद येथील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सासरकडील लोकांनी अपाची मोटारसायकल घेऊन न दिल्याने पतीकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.
अंजनीकुमारी शिवाजी मौर्या (वय २१, रा. बारावा मैल, लोणीकंद) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिचा भाऊ विजयबहादुर पतीराम मौर्या (वय २७, रा. सेमरा, सोनपूर, ता. जि. बलरामपूर, उत्तरप्रदेश) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी शिवाजी रमेशचंद्र मौर्या (वय २६, रा. बारावा मैल, लोणीकंद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १६ सप्टेंबर रोजी लोणीकंदमधील राहत्या घरी घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची लहान बहीण अंजनीकुमारी मौर्या हिचा विवाह त्यांच्या शेजारच्या गावातील रमेशचंद्र मौर्या (रा. बेलाश, सोनपूर, बलरामपूर) यांचा मुलगा शिवाजी मौर्या याच्याशी २८ एप्रिल रोजी झाला.
समाजातील रितीरिवाजाप्रमाणे अडीच लाख रुपये रोख, नवरदेवासाठी सोन्याची चैन, अंगठी व गळ्यातील सोन्याची मोहर, असे दागिने व फर्निचर तसेच संसारोपयोगी भांडी व वस्तू देण्यात आल्या. काही दिवस गावाला राहून ४ महिन्यांनंतर ते लोणीकंद येथील बारावा मैल येथे राहू लागले.
पुण्यात राहायला आल्यावर शिवाजी याने अंजनीकुमारी हिला “तुझ्या बापाने अपाची मोटारसायकल का दिली नाही” या कारणावरून वारंवार शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक छळ सुरु केला. तिने फोन करून आपल्या वडिलांना सांगितले.
त्यावेळी तिच्या वडिलांनी शिवाजी मौर्या याला “आम्ही परिस्थितीने गरीब आहोत, आम्हाला समजून घ्या” असे समजावून सांगितले होते. १६ सप्टेंबर रोजी सकाळी पावणे दहा वाजता अंजनीकुमारी हिने वडिलांना फोन करून सांगितले की, “शिवाजी हा अपाची गाडी दिली नाही म्हणून मला सारखी मारहाण करतो, त्याचा छळ आता सहन होत नाही.”
वडिलांनी शिवाजी याच्याकडे फोन देण्यास सांगितले. शिवाजी याने वडिलांना सांगितले की, “तु काय माझे उखाडणार आहेस? मी अंजनीला मारून फेकणार आहे,” असे बोलून फोन कट केला. त्यानंतर अंजनीकुमारी हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण पुढील करीत आहेत.
