गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसासह युवक जेरबंद
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने धडाकेबाज कारवाई करत गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका युवकास जेरबंद केले.
दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.०० वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीच्या आधारे राणी लक्ष्मीबाई उद्यान परिसर, सोलापूर रोड, बार्शी येथे सापळा रचण्यात आला.
या वेळी रोहित संतोष मारकड (वय २१ वर्षे, रा. उपळाई (रमाळा), ता. कळंब, जि. धाराशिव, सध्या रा. चोरमुले प्लॉट, बार्शी) यास ताब्यात घेण्यात आले. पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल (मॅगझीनसह) व एक जिवंत काडतूस विनापरवाना बेकायदेशीररीत्या आढळून आले. पोलिसांनी तत्काळ शस्त्र व काडतूस जप्त केले.
याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६८/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर करीत आहेत.
ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर व पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, पोहेकॉ प्रविण साठे, अमोल माने, पोकॉ सचिन देशमुख, अंकुश जाधव, अजीज शेख, बाळकृष्ण मुठाळ, अविनाश पवार, राहुल उदार, सचिन नितनात, इसामिया बहिरे, सतीश उघडे व वैभव भांगे यांनी सहभाग घेतला.
नागरिकांना आवाहन – अवैध शस्त्रे बाळगणे हा गंभीर गुन्हा आहे. नागरिकांनी संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा आपत्कालीन क्रमांक ११२ वर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.















