खंडणी विरोधी पथकाची कामगिरी, पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दहशत पसरविण्यासाठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने घरातून पकडले असून त्याच्याकडून पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
ईश्वर प्रशांत तुपसुंदर (वय २२, रा. कसबा पेठ) असे या गुंडाचे नाव आहे. ईश्वर तुपसुंदर हा ३१ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या खुनामध्ये सहभागी होता. याबाबत पोलीस अंमलदार मयूर भोकरे यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे, पोलीस हवालदार अमोल आवाड, सयाजी चव्हाण, गीतांजली जांभुळकर, रहीम शेख, राजेंद्र लांडगे, विजय कांबळे आणि पोलीस अंमलदार मयूर भोकरे हे २२ सप्टेंबर रोजी गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत होते.
हवालदार अमोल आवाड व मयूर भोकरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की ईश्वर तुपसुंदर याच्याकडे पिस्तूल असून त्याने ते आपल्या कसबा पेठेतील घरात ठेवले आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगाव यांना ही माहिती सांगण्यात आली.
बातमीनुसार पोलीस पथक ईश्वर तुपसुंदर याच्या घरी गेले. चौकशी केल्यावर सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याने पिस्तूल असल्याची कबुली देऊन स्काय बॅगेमध्ये ठेवलेले पिस्तूल काढून दिले. पिस्तूलची पाहणी केली असता त्याच्या मॅगझीनमध्ये २ जिवंत काडतुसे आढळली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगाव, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे, अमोल आवाड, पोलीस हवालदार नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, बाला रफिक शेख, राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, रहीम शेख, मयूर भोकरे, विजय कांबळे, अमर पवार आणि गीतांजली जांभुळकर यांनी केली आहे.















