कामावरून काढून टाकल्याने केले कृत्य, विमानतळ पोलिसांनी चार तासांत शोधले
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : काम व्यवस्थित करत नसल्याने ठेकेदाराने कामावरून काढले. त्या रागातून झारखंडमधील दोघांनी ठेकेदाराच्या ३ वर्षांच्या मुलीचे अपहरण केले. ही बाब समजताच विमानतळ पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. ते इंद्रायणी एक्सप्रेसमधून प्रवास करत असल्याचे समजल्यावर लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने दोघांना कल्याण रेल्वे स्टेशनवर जेरबंद करून मुलीची सुटका करण्यात आली. जवळपास ४ तासांच्या प्रयत्नानंतर हे अपहरणकर्ते पोलिसांच्या तावडीत सापडले.
प्रिन्स पाल (वय २५) आणि ओमनारायण पाल (वय २४, रा. शुभ निर्मल सिंबायोसिस लॉ कॉलेजजवळ, विमाननगर, मूळ रा. बक्सर, बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शिवशंकर पृथ्वीचंद पासवान (वय २६, रा. शुभ निर्मल, विमाननगर) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ठेकेदार असून ते वेगवेगळ्या बांधकाम साईटवर मजुर पुरविण्याचे काम करतात. प्रिन्स पाल व ओमनारायण पाल हे दोघे जण व्यवस्थित काम करत नसल्याने त्यांनी दोघांना कामावरून काढले.
त्याचा राग मनात धरून त्यांनी या ठेकेदाराच्या ३ वर्षांच्या मुलीचे सोमवारी सायंकाळी ५ वाजता अपहरण केले. काही वेळ मुलगी न दिसल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी चौकशी केली असता, काम सोडून जाणाऱ्यांपैकी चौघे जण बिहारकडे निघाल्याचे समजले.
प्रिन्स पाल व ओमनारायण पाल यांचे लोकेशन तपासले असता ते तळेगाव दाभाडे परिसरात असल्याचे दिसून आले. यांनीच मुलीचे अपहरण केल्याचा संशय आला. यानंतर त्यांच्या शोधासाठी एक पथक रवाना झाले.
पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे शोधून काढले की ते दोघे इंद्रायणी एक्सप्रेसने प्रवास करत आहेत. त्यानुसार पोलिसांनी लोहमार्ग पोलिसांना अलर्ट केले. पाठोपाठ पोलीस पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
इंद्रायणी एक्सप्रेस रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकावर पोहोचली. तेथे ही एक्सप्रेस २ मिनिटे थांबते. इतक्या वेळात लोहमार्ग पोलिसांनी संपूर्ण रेल्वेची तपासणी केली. विमानतळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी मुलीला घेऊन जाणाऱ्या या दोघांना ताब्यात घेऊन रेल्वेतून खाली उतरवले.
विमानतळ पोलिसांचे पथक रात्री उशिरा कल्याणला पोहोचले. त्यांनी मुलीला ताब्यात घेऊन तिच्या आईवडिलांकडे सुपूर्द केले. या दोघांना घेऊन पोलीस पथक मंगळवारी सकाळी पुण्यात परत आले आहे.
ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके, सहायक पोलीस निरीक्षक अशोक शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

















