लंडन युनिर्व्हसिटीतून पीएचडी केलेला, युपीएससी पास मास्टर माईडचा हात, सायबर पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : आयआयटी मुंबईतील प्राध्यापकाच्या नावाने प्रकल्प देण्याच्या बहाण्याने एमआयटीची २ कोटी ४६ लाख रुपयांची फसवणूक करणार्या सायबर चोरट्याला सायबर पोलिसांनी हैद्राबाद येथून जेरबंद केले आहे.
सितैया किलारु (वय ३४, रा. मेहेर रोड, याप्रल, हैद्राबाद, तेलंगणा) असे या सायबर चोरटयाने नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे सितैया किलारु हा उच्च शिक्षित असून हा मुळचा विजयवाडामधील असून सध्या हैद्राबाद येथे वास्तव्याला आहे.
सितैया किलारु हा उच्च शिक्षित असून २०१० ते २०१४ मध्ये लंडन येथील स्टॅफोर्डशाईर युनिर्व्हसिटी येथे ई एन टी सी मध्ये मास्टर डिग्री तसेच ब्रिमिंगहम युनिर्व्हसिटी लंडन येथे ई एन टी सीमध्ये पीएचडी केली आहे. त्यानंतर त्याने २०१५ ते २०१६ मध्ये हैद्राबाद येथील कोनेरु युनिर्व्हसिटी येथे नोकरी केली.
२०१६ ते २०१८ मध्ये बी आर आय टी युनिर्व्हसिटी, हैद्राबाद येथे नोकरी केली. २०१९ व २०२० मध्ये यु पी एस सी पूर्व व मुख्य परिक्षा पास झाला. २०२१ मध्ये ऑनलाईन टिचिंग यु पी एस सी प्रिप्रेशन बाबत तयारी केली. २०२२ पासून कौटुंबिक वाद झाल्यावर कोठेही नोकरी करीत नाही.
सितैया किलारु हा सराईत सायबर चोरटा असून त्यांच्यावर हैद्राबाद सायबर पोलीस ठाण्याच्याविरुद्ध २०२४ मध्ये चार गुन्हे दाखल आहेत. तसेच तेलंगणा सायबर क्राईम पोलीस ठाणे येथे २०२३ ते २०२४ मध्ये फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल आहे. गचीबोवली पोलीस ठाणे व मेडीपेंली पोलीस ठाणे, तेलंगणा या दोन ठिकाणी दोन गुन्हे दाखल आहेत.
एमआयटीच्या वतीने सायबर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे यातील एमआयटीची एकूण २ कोटी ४६ लाख रुपयांची फसवणूक करणार्या व्यक्तीचे नाव सितैया किलारु असे असल्याचे निष्पन्न केले.
त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यासाठी स्वप्नाली शिंदे व सायबर पोलीस पथक १८ सप्टेंबर रोजी हैद्राबाद येथे रवाना झाले. हैद्राबाद येथे शोध घेतल्यावर तो याप्रल येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडे विचारपूस केल्यावर तोच या गुन्ह्याचा मास्टर माईड असल्याची खात्री पटल्याने त्याला अटक केली़
सितैया किलारु याच्याकडून १० डेबिट कार्ड, १३ पास बुक, १५ चेकबुक, एक सीमकार्ड, सोने खरेदी पावत्या, इतर कागदपत्रे, ७० हजार रुपयांचे किंमतीचे ४ मोबाईल, १ टॅब, १ लॅपटॉप, १ लाख ५ हजार रुपयांचे दागिने, ४० लाख रुपयांची टोयोटा कार व ८ लाख रुपयांची सोनेट कार असा एकूण ४९ लाख ७५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे़
आरोपीला ट्रान्झिट रिमांड घेऊन पुण्यात आणण्यात आले़ न्यायालयाने आरोपीला २८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़ ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिांदे पोलीस निरीक्षक संगिता देवकाते, पोलीस हवालदार संदिप मुंढे, बाळासो चव्हाण, नवनाथ कोंडे, संदिप कारकुड, टिना कांबळे, पोलीस अंमलदार अमोल कदम, सचिन शिंदे, सुप्रिया होळकर, पोलीस हवालदार गंगाधर काळे, पोलीस अंमलदार अदनान शेख, सतिश मांढरे, पोलीस अंमलदार कृष्णा मारकड यांनी केली आहे.
सायबर पोलिसांचे आवाहन
शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त परताव्याचे आमिष, अटकेची भिती, पार्सलमध्ये ड्रग्ज, इलेक्ट्रीसिटी, गॅस कनेक्शन बंद होईल, आॅनलाईन बँक केवायसी अपडेट अशी प्रलोभणे व धमक्या प्राप्त झाल्यास त्या व्यक्तीबाबत एन सी आर पी पोर्टल वर संपर्क साधून नजिकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, जेणेकरुन आपली फसवणूक टाळता येईल. तसेच एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या बँक खात्यावर मोठी रक्कम ट्रान्सफर करताना बँकेचे खाते क्रमांक, धारकाचे नाव, बँक शाखेचे नाव इत्यादी बाबत खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
