१५० जणांची २० ते २५ कोटींची फसवणूक करणारी टोळी जेरबंद : पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शेअर मार्केटमध्ये जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणुक करण्यासाठी चायनीज सायबर चोरट्यांना येथील बँक खाती उपलब्ध करुन देणारे रॅकेट अजून एकदा दिसून आले आहे़ या चोरट्यांनी १५० ते १६० नागरिकांची अंदाजे २० ते २५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. सायबर पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे.
यश भारत पाटोळे (वय २५, रा. रमण मळा, कोल्हापूर), यासीर अब्दुल माजिद शेख (वय ३४, रा. निर्माण सेरेन, उंड्री), मोहम्मद सुलतान अहमद मोहम्मद जेहरुद्दुन (वय ३०, रा. पटणा, बिहार), माझ अफसर मिर्झा (वय २४, रा. घोरपडी पेठ, मोमीनपुरा), हुसेन ताहीर सोहेल शेख (वय २३, रा. मुजीब कॉलनी, संभाजीनगर), बाबुराव शिवकिरण मेरु (वय ४१, रा. निर्मल टाऊनशिप, काळेबराटेनगर, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
फार्मा कंपनीत प्रोग्रामर असलेल्या तक्रारदार यांना फेसबुकवर एक जाहिरात दिसली. त्या जाहिरातीमध्ये शेअर मार्केटमध्ये रोज १० ते २० टक्के नफा मिळेल, असे सांगितले जात होते. त्यांना कोटक क्युआयबी या बनावट शेअर मार्केट ट्रेडिंग अॅपवर ८९ लाख ३५ हजार रुपये गुंतवणुक करण्यासाठी सांगितले. फिर्यादीने गुंतवलेल्या रक्कमेवर ८ कोटी ७१ लाख रुपये नफा दाखविला. त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना सर्व्हिस टॅक्स भरायला सांगून फसवणुक केली होती.
या गुन्ह्यात आरोपींनी कॉसमॉस बँकेच्या खात्याचा वापर केला होता. त्यात ३३ लाख ८६ हजार रुपये ट्रान्सफर करुन घेतले होते. पोलिसांनी या खात्याची माहिती घेतल्यावर ते ट्रेडिंग गुरु या नावाने यश पाटोळे चालवत होता. तांत्रिक विश्लेषणातून तो कोंढव्यातील हॉटेलमध्ये मिळून आला.
त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर कोंढव्यातील ओंकार प्राईड हॉटेल येथे त्याचे साथीदार एकत्र मिळून अकाऊंट चालवित असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ओंकार प्राईड हॉटेलवर छापा टाकून ५ जणांना पकडले. ते टेलिग्रामवरुन चाजनीज भाषा बोलणारे व्यक्तीच्या संपर्कात राहून सीसीटीव्ही कॅमेरे लावून अजित आनंदराव गायकवाड (रा. सांगली) व धनाजी नाथा पाटील (रा. सांगली) यांचे बँक ऑफ महाराष्ट्राचे दोन बँक खातील चालवित असल्याचे मिळून आले.
त्यांच्याकडून ९ मोबाईल, १५ सिमकार्ड, ४ सीसीटीव्ही कॅमेरे, ८ चेक बुक, २० एटीएम/डेबीट कार्ड, १ लॅपटॉप, १ मेमरी कार्ड, १ पासपोर्ट, १३ हजार ५५० रुपये असा माल जप्त केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे करत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण, रोहित डोळस, प्रकाश कातकाडे, विद्या पाटील, पोलीस अंमलदार हेमंत खरात, सुभाष पाटील, अभिजित उकिरडे, अतुल लोखंडे, सौरभ घाटे, प्रविण शेळकदे, सचिन घाडगे, मुकुंद वारे, दीपक भोसले, सोपान बोधवड, माधव आरोटे, सुरज शिदे, स्वप्नील कणसे, विशाल निचीत, निलेश देशमुख, संतोष सपकाळ, ज्योती साळे, दीपाली चव्हाण, नम्रता कांबळे यांनी केली आहे़ सरकारी अभियोक्ता गिरीष बारगजे यांनी न्यायालयात बाजु मांडून आरोपींची पोलीस कोठडी मिळवुन देण्यात मदत केली आहे.
चायनीज सायबर चोरट्यांशी संंगनमत
त्यांच्याकडे चौकशी केल्यावर ते चायनीज व्यक्तीशी संगनमत करुन वेगवेगळे बँक खाती प्राप्त करुन या खात्यांचा वापर फसवणुकीसाठी चालवून त्यामध्ये फसवणुकीची रक्कम घेऊन ती रक्कम बाहेरील देशातील साथीदारांना क्रिप्टो करन्सी, यु एस डी टीचे माध्यमातून पाठवत. त्यांच्याकडून हवाला, मनि ट्रान्सफर व इतर मार्गाने ही रक्कम घेऊन सायबर फसवणूक करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी आतापर्यंत १५० ते १६० नागरिकांची अंदाजे २० ते २५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
केवळ ५ टक्केसाठी देशाशी बेईमानी
परदेशातील विशेषत: चायनीज सायबर चोरट्यांना फसवणुकीची रक्कम घेण्यासाठी येथील बँक खाती उपलब्ध करुन दिली जाते. ज्याचे बँक खाते आहे. त्याला खात्यात आलेल्या रक्कमेच्या ५ टक्के कमिशन मिळते. तर या साठी रॅकेट चालविणारे, येथील पैसे हवाला मार्फत परदेशात पाठविणार्यांना केवळ दर दिवशी १ हजार रुपये मिळतात. अशा किरकोळ पैशांसाठी देशातील लोकांना लुटण्यासाठी हे चोरटे परदेशातील सायबर चोरट्यांना मदत करुन देशाशी बेईमानी करत असल्याचे दिसून आले आहे.
