शेअर ट्रेडिंग करणाऱ्या व्यावसायिकाला सायबर चोरट्यांचा सव्वा दोन कोटींना गंडा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या व्यावसायिकाला तब्बल २ कोटी २४ लाख रुपयांना सायबर चोरट्यांनी गंडा घातला. या प्रकरणातील १ कोटी ५ लाख रुपये बँक खात्यात स्वीकारणाऱ्या साथीदाराला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी मांजरी परिसरातून अटक केली. अटक झालेल्या आरोपीचे नाव संतोष सदाशिव रुपनर (वय ४७, रा. मांजरी बुद्रुक) असे आहे.
फिर्यादी हे शेअर ट्रेडिंगचे काम करतात. त्यांना ३१० बुल्स अँड चाय व ३०५ बुल्स अँड चाय या दोन ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. या ग्रुपमध्ये शेअर्स खरेदी-विक्री आणि गुंतवणुकीसंबंधी माहिती दिली जात होती. “आम्ही सांगितलेल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक केल्यास १० ते १५ टक्के नफा मिळेल,” असे सांगून फिर्यादींचा विश्वास संपादन करण्यात आला.
सुरुवातीला गुंतवणुकीवर नफा दाखवून ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. त्यामुळे फिर्यादींचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी सांगितलेल्या विविध खात्यांवर एकूण २ कोटी २४ लाख ५९ हजार ९९९ रुपये गुंतवले.
या रकमेवर तब्बल १० कोटी रुपये नफा दाखविण्यात आला. मात्र, पैसे काढण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी वेगवेगळे चार्जेस मागण्यास सुरुवात केली. संशय आल्याने फिर्यादींनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणातील सव्वा दोन कोटींपैकी १ कोटी ५ लाख रुपये अॅक्सिस बँक खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले. हे खाते जनसेवा इंडस्ट्रीज प्रा. लि. या नावाने असून ते प्रत्यक्षात आरोपी संतोष रुपनर याचे असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. स्वारगेट पोलिसांच्या मदतीने रुपनर याला अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण, रोहित डोळस, प्रकाश कातकाडे, विद्या पाटील, अंमलदार दीपक भोसले, विनायक म्हसकर, हेमंत खरात, कृष्णा गवळी, श्रीकांत कबुले, अभिजित उकिरडे, अतुल लोखंडे, माधव आरोटे, सोपान बोधवड, संतोष सपकाळ, दिपाली चव्हाण यांनी केली.
देशभरातील १२ फसवणूक प्रकरणात खात्याचा वापर
संतोष रुपनर याने खासगी व्यवसाय दाखवून जनसेवा इंडस्ट्रीज या नावाने अॅक्सिस बँकेत खाते उघडले होते. या खात्यात १ कोटी ५ लाख रुपये जमा झाले होते. विशेष म्हणजे, देशातील विविध राज्यांमध्ये नोंदवलेल्या फसवणुकीच्या तब्बल १२ गुन्ह्यांत या खात्याचा वापर झाल्याचे समोर आले आहे. या खात्यातून एकूण ३ कोटी ५३ लाख ८७ हजार ९३५ रुपयांचा व्यवहार झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
