शेअर मार्केट गुंतवणुकीतून दीड कोटींची फसवणूक : इचलकरंजीतील दोन भामटे गजाआड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग करणाऱ्या तळेगाव येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी ५४ लाख ५६ हजार ५५४ रुपयांची फसवणूक करणाऱ्या इचलकरंजी येथील दोन भामट्यांना सायबर पोलिसांनी उर्से टोलनाक्यावर थरारक पाठलाग करून अटक केली.
अटक केलेल्या आरोपींची नावे अक्रम शमशुद्दीन शेख (३३, रा. रेंदाळकर मळा, दत्त कॉलनी, इचलकरंजी) व विनय सत्यनारायण राठी (३४, रा. एम. जी. मार्केट, विक्रमनगर, इचलकरंजी) अशी आहेत.
तक्रारदार व्यवसायिकाला बुल मार्केट डॉट कॉम या ऑनलाईन गुंतवणूक प्लॅटफॉर्मबाबत माहिती मिळाल्यानंतर परदेशातील मोबाईल क्रमांकधारकाने टेलिग्राम व झूम कॉलद्वारे संपर्क साधला.
चांगला परतावा मिळेल या आमिषाने सुरुवातीला किरकोळ नफा दाखवून विश्वास संपादन केला आणि नंतर विविध बँक खाते तसेच क्रिप्टो वॉलेटवर पैसे गुंतविण्यास भाग पाडले. त्यामुळे तक्रारदाराला ९ लाख ८४ हजार ५५४ रुपये रोख व २ बिटकॉईनमधून १ कोटी ४४ लाख ७२ हजार रुपये, अशा एकूण १ कोटी ५४ लाख ५६ हजार ५५४ रुपयांचा फटका बसला.
गुन्ह्याच्या तपासात आरोपींनी शैलेंद्र इम्पेक्स नावाने इचलकरंजीत बोगस फर्म सुरू करून महाराष्ट्र बँकेत खाते उघडले असल्याचे उघड झाले. या खात्यात गुन्ह्यातील ८ लाख ६४ हजार ४०० रुपये जमा झाले होते. अक्रम शेख याने हे खाते इतरांच्या कागदपत्रांचा वापर करून उघडल्याचे समोर आले. तपास सुरू असताना पोलिसांना आरोपी पळून जात असल्याची खबर मिळाली.
पोलिस उपनिरीक्षक सागर पोमण यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून आरोपींचा माग काढला. अक्रम शेख व विनय राठी हे कारने मुंबईच्या दिशेने पळून जात असताना पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील उर्से टोलनाक्यावर पोलिसांनी पाठलाग करून दोघांना जेरबंद केले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यामध्ये पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण, रोहित डोळस, प्रकाश कातकाडे, विद्या पाटील, तसेच अंमलदार दीपक भोसले, विनायक म्हसकर, हेमंत खरात, कृष्णा गवळी, श्रीकांत कबुले, अभिजित उकिरडे, अतुल लोखंडे, माधव आरोटे, सोपान बोधवड, संतोष सपकाळ, दिपाली चव्हाण आदींनी सहभाग घेतला.
सरकारी अभियोक्ता गिरीष बारगजे यांनी न्यायालयात बाजू मांडून आरोपींना पोलिस कोठडी मिळवून दिली.
कमिशनसाठी देशद्रोह
अक्रम शेख हा विविध बँक खाती मिळवून देत असे, तर विनय राठी हा मोबाईल स्टोअरमध्ये नोकरी करत होता. आरोपींनी ही खाती ऑनलाईन अपडेट करून त्यांचा साथीदार विराज जोशी (रा. मुंबई) याला देत आणि दुबईतील सायबर गुन्हेगारांसाठी वापरत. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर कमिशन मिळत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
