खंडणी विरोधी पथकाची मोठी कामगिरी : भांडणाचा बदला घेण्यासाठी बाळगली होती शस्त्रे
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : जुनी सांगवी परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी शस्त्रे बाळगणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईत आरोपींकडून ४ गावठी पिस्टल व ५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून त्यांची अंदाजे किंमत १ लाख ६४ हजार ३०० रुपये इतकी आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रोहित दुर्गेश धर्माधिकारी (वय २४, रा. प्रियदर्शननगर, जुनी सांगवी) आणि अभिषेक राजू टेंकल (वय २३, रा. विष्णु कृपानगर, जुने शिवाजीनगर बसस्थानकाच्या मागे, शिवाजीनगर) अशी आहेत.
खंडणी विरोधी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत फरारी आरोपींचा शोध घेत होते. यावेळी पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे आणि प्रशांत शिंदे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित धर्माधिकारी हा शिवाजीनगर येथील ज्ञानेश्वर पादुका चौकात येणार असून त्याच्याकडे शस्त्रे आहेत. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी ज्ञानेश्वर पादुका चौकात सापळा रचला आणि दोघांनाही ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपींकडून एकूण ४ पिस्टल व ५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव यांच्यासह खंडणी विरोधी पथकातील सुरेंद्र जगदाळे, रवींद्र रोकडे, दिलीप गोरे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, अजिनाथ येडे, पवन भोसले, रोहिल शेख, अमोल राऊत, प्रशांत शिंदे, आझाद पाटील, गणेश खरात, शेखर खराडे, चेतन आपटे आणि किरण पड्याळ यांनी केली.
रोहित धर्माधिकारी हा बेकायदा शस्त्र विक्रीमध्ये तरबेज असून तो अनेक वर्षांपासून गावठी पिस्टल विक्रीच्या धंद्यात सक्रिय आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत आर्म ॲक्ट अंतर्गत ५ गुन्हे दाखल आहेत. तसेच भोसरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हाही दाखल आहे.
अभिषेक टेंकल याच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट तसेच सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल आहे. प्राथमिक चौकशीत, सांगवी परिसरात झालेल्या एका भांडणाचा बदला घेण्यासाठी तसेच शस्त्र विक्रीसाठी ही शस्त्रे आणल्याचे रोहित धर्माधिकारी याने कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
















