कोथरुड पोलिसांनी २० दिवसांत दाखल केले चार गुन्हे : पासपोर्ट कसा मिळविला, याचा घेतला जाणार शोध
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट मिळविल्याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी गँगस्टर निलेश घायवळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गेल्या २० दिवसांत घायवळविरुद्ध चार गुन्हे नोंदविण्यात आले असून, त्यातील हा चौथा गुन्हा आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी निलेश बन्सीलाल घायवळ (वय ४९, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड) तसेच त्याला पासपोर्ट मिळविण्यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या मदत करणार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याआधी कोथरुडमधील मुठेश्वर मित्र मंडळाजवळ दुचाकीला साइड न दिल्याच्या कारणावरून घायवळ टोळीतील गुंडांनी एका तरुणावर गोळीबार केला होता. त्या प्रकरणात निलेश घायवळसह १० जणांवर गुन्हा दाखल झाला असून, त्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लागू करण्यात आला आहे.
दरम्यान, घायवळ हा बनावट पासपोर्टवर ९० दिवसांच्या व्हिसावर स्वित्झर्लंडला गेल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्याने अहिल्यानगर येथील पत्त्यावरून तत्काळ प्रक्रियेद्वारे पासपोर्ट मिळविला होता. त्याने “गायवळ” या खोट्या नावाचा वापर करून फसवणुकीच्या मार्गाने पासपोर्ट मिळविल्याचे समोर आले आहे.
कोथरुड पोलिसांनी अहिल्यानगर येथे जाऊन तपास केला असता, त्या पत्त्यावर तो राहत नसल्याचे अहिल्यानगर पोलिसांनी नोंदवून पासपोर्ट कार्यालयाला अहवाल पाठविला होता. तरीदेखील पासपोर्ट विभागाने त्याला पासपोर्ट कसा दिला, याचा तपास सुरू आहे.
या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी बनावट कागदपत्रे तयार करणे, इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करणे आणि पासपोर्ट अधिनियमाचे उल्लंघन अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. निलेश घायवळचे कोथरुडमधील संत ज्ञानेश्वर कॉलनीत घर असून, शनिवारी पोलिसांनी त्याच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकला.
या झडतीत दोन काडतुसे, चार पुंगळ्या, धाराशिव, पुणे, मुळशी आणि जामखेड येथील जमिनींची कागदपत्रे, तसेच सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
