जयेश शहा यांच्या पुढाकाराने वडनेर परिसरात रेशन कीट व चारा वाटप
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : श्री आदि जिन युवक चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई चे अध्यक्ष जयेश शहा जरिवाला यांच्या पुढाकाराने अलीकडील पूरग्रस्त भागात मानवसेवा आणि गोसेवा या दोन्ही क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय मदतकार्य राबविण्यात आले.
पूरामुळे निर्माण झालेल्या अन्नधान्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टच्या सेवाभावी उपक्रमांतर्गत वडनेर परिसरात गरजू कुटुंबांना रेशन कीट वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक पूरग्रस्त कुटुंबांना तात्काळ दिलासा मिळाला.
तसेच, गौशाळा, वडनेर येथे गोमातेच्या सेवेसाठी एक ट्रक चारा देण्यात आला. पूरस्थितीत चाऱ्याच्या तीव्र टंचाईत असलेल्या गोधनांसाठी हा उपक्रम मोठा आधार ठरला आहे. ट्रस्टचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सांगितले की, “जीवदया हीच खरी जिनसेवा आहे. संकटाच्या काळात मानव आणि प्राणी दोघांप्रती करुणाभाव दाखवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.”
या सेवाकार्यात सहभागी झालेल्या सर्व दाते व स्वयंसेवकांचे श्री आदि जिन युवक चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई तर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.
