तीन महिने वेशभूषा बदलून फिरणाऱ्या गुन्हेगाराचा पोलिसांनी वाघोलीजवळ सापळा रचून केला शोध
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यावर शिवाजीनगर न्यायालयातून पळून गेलेल्या अनमोल अतुल जाधवराव (वय ३६, रा. सुरजनगर, कोथरुड) याला शिवाजीनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
अनमोल अतुल जाधवराव (वय ३६, रा. सुरजनगर, कोथरुड डेपोसमोर) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध २०१२ मध्ये चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा होता. या गुन्ह्यात त्याला १९ जुलै २०२५ रोजी शिक्षा सुनावली होती. शिक्षा सुनावल्यानंतर तो न्यायालयातून पळून गेला होता.
अतुल जाधवराव याच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये विनयभंग करणे, पोलीस आदेशाचे उल्लंघन करणे २०१८ व २०१९ मध्ये आर्म अॅक्ट चे दोन गुन्हे असे एकूण ५ गुन्हे दाखल आहेत. अनमोल जाधव हा न्यायालयातून पळून गेल्याचा गुन्हा १९ जुलै २०२५ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.
पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना ६ ऑक्टोबर रोजी माहिती मिळाली की, अनमोल जाधवराव हा अहिल्यानगरहून कारमधून वाघोलीच्या दिशेने येत आहे. त्याबरोबर शिवाजीनगर पोलिसांनी वाघोलीजवळील खांदवेनगर येथील हॉटेल कावेरी समोर सापळा रचला. एक कार तेथे आल्यावर पोलिसांनी कारमधील दोघांना ताब्यात घेतले. अनमोल जाधवराव याला पकडले.
त्याच्याबरोबर दुसरा संशयित अक्षय संजय हंपे (वय ३०, रा. सौरभनगर, भिगांर, अहिल्यानगर) हा होता. त्याच्यावर अहिल्यानगर येथील भिगांर कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असून पोलीस त्याचा शोध घेत होते. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश् मुलगीर यांच्या ताब्यात त्याला देण्यात आले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस आयुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) धनंजय पिगळे, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, प्रमोद पाटील, पोलीस हवालदार दीपक चव्हाण, राजकिरण पवार, पोलीस अंमलदार सचिन जाधव, दीपक रोमाडे, सुदाम तायडे, श्रीकृष्ण सांगवे, इसाक पठाण, तेजय चोपडे, दिनेश भोसले यांनी केली आहे.
तीन महिने वेशभुषा बदलून होता फिरत
शिवाजीनगर न्यायालयातून पळून गेल्यावर अनमोल जाधवराव हा वेगवेगळ्या ठिकाणी गेले ३ महिने फिरत होता. पोलिसांनी त्यांचा शोध घेत असताना तो नाशिक, मुंबई, सातारा, सांगली तसेच पौंड, मुळशी, हवेली अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वेशभुषा करुन वावरत होता. टि व्हीवरील क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया, सीआयडी या सिरीयल पाहून पोलीस आरोपीला शोधण्यासाठी कसे प्रयत्न करतात, हे त्याला माहिती झाले होते. त्यामुळे दर १०० ते १५० किलोमीटर अंतरानंतर ठिकाण बदलून रस्त्याने जाणार्या लोकांना ‘माझा मोबाईल फोन हरविला आहे़ माझ्या घरांशी संपर्क करावयाचा आहे,’ असे कारण सांगून मित्रांशी संपर्क साधत होता. त्या मोबाईलवरुन तो संबंधित ठिकाणी असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस तेथे जात होते. परंतु, त्याने वेशभूषा बदलली असल्याने व तो तेथून निघून जात असल्याने तो पोलिसांच्या हाती लागत नसे.
