तुझ्यामुळे मला अटक झाली : १० लाखांची मागणी केली होती खंडणी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : “तुझ्यामुळे मला अटक झाली, १० लाख रुपये दे, नाहीतर गोळ्या खायला तयार राहा,” अशी धमकी देऊन तरुणाकडे खंडणी मागणाऱ्या गॅंगस्टर नीलेश घायवळचा एकेकाळचा साथीदार संतोष धुमाळ याच्यासह तिघांवर पोलिसांनी ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई केली आहे.
संतोष आनंद धुमाळ, सागर गवासने आणि विपुल उत्तम माझिरे अशी ‘मोक्का’ कारवाई झालेल्यांची नावे आहेत. गेल्या महिन्यात त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ते अजूनही फरार आहेत.
संतोष धुमाळ याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, आर्म्स ॲक्ट असे एकूण २१ गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याला तडीपार करण्यात आले असून त्याच्यावर ‘मोक्का’ अंतर्गतही कारवाई झाली होती.
सागर गवासने याच्यावर जामखेड, बीड आणि उस्मानाबाद येथे एकूण १० गुन्हे आहेत, तर विपुल माझिरे याच्यावर २ गुन्हे दाखल आहेत. संतोष धुमाळ हा पूर्वी नीलेश घायवळ टोळीचा खास सदस्य होता. मात्र काही कारणांवरून त्यांच्यात वाद झाले आणि त्यानंतर त्याने घायवळ टोळी सोडली.
याबाबत रोहित आखाडे यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहित आखाडे हा पूर्वी संतोष धुमाळच्या टोळीत होता. एका गुन्ह्यात आखाडे याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी संतोष धुमाळ याला २०२१ मध्ये अटक केली होती.
४ सप्टेंबर २०२५ रोजी संतोष धुमाळ व इतर दोघांनी रोहित आखाडे याला सांगितले की, “तुझ्यामुळे मला अटक झाली, १० लाख रुपये दे, नाहीतर गोळ्या घालीन,” अशी धमकी दिली होती. हा तपास सहायक पोलिस आयुक्त भाऊसाहेब पठारे अधिक करीत आहेत.
