घायवळ पारपत्र प्रकरणी पुणे पोलिसांकडून पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांना नोटीस
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळच्या पारपत्राची पोलीस पडताळणी करणाऱ्या अहिल्यानगरमधील अहमदपूर विभागातील तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना त्यांना नोटिशीद्वारे देण्यात आली आहे.
‘घायवळने अहिल्यानगर ग्रामीण पोलीस दलातील अहमदपूर विभागातून बनावट कागदपत्रे सादर केली. ‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ नावाने बनावट कागदपत्रे सादर करून २०१९ मध्ये पारपत्र मिळवले. अहमदपूर पोलिसांनी पारपत्र पडताळणी (पासपोर्ट व्हेरिफिकेशन) केली होती.
या प्रकरणाची चौकशी पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. चौकशीत अहमदपूर येथील विशेष शाखेतील पारपत्र विभागात कार्यरत असलेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळ सध्या युरोपमध्ये आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी पोलिसांकडून केंद्र शासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेशी (इंटरपोल) संपर्क साधण्यात आला आहे. घायवळला ताब्यात घेण्यासाठी ब्लू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे.
कोथरूडमधील पोलीस निरीक्षकाची चौकशी – नीलेश घायवळविरुद्ध यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. ३० नोव्हेंबर २०२२ रोजी न्यायालयाने त्याला कोथरूड पोलिसांकडे पारपत्र जमा करण्याचे आदेश दिले होते, मात्र त्याने ते जमा केले नव्हते. त्यानुषंगाने कोथरूड पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षकाची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
नीलेश घायवळवर आणखी एक गुन्हा – एका नागरिकाच्या आधारकार्डाचा गैरवापर करून नीलेश घायवळने त्याच्या नावावर सिम कार्ड घेतले. तसेच विविध बँकांमध्ये खाती उघडून मोठ्या प्रमाणात व्यवहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. नीलेश घायवळने तक्रारदाराला १३ जानेवारी २०२० रोजी रात्री जबरदस्तीने एका ठिकाणी नेले आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याचे आधारकार्ड वापरून तक्रारदाराच्या नावावर “बॉस” अक्षर असलेले सिम कार्ड घेतले. हे सिम कार्ड स्वतःचे असल्याचे भासवून अनेक बँक खाती उघडली आणि मोठ्या प्रमाणावर व्यवहार करून फिर्यादी तसेच बँकांची फसवणूक केली. या प्रकरणात नीलेश घायवळविरुद्ध फसवणूक आणि धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
