बार्शी गुन्हे प्रकटीकरण पथकाची तपासकौशल्यपूर्ण कामगिरी : आरोपीला पकडून गुन्ह्याची कबुली मिळवली
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने चोख दक्षता आणि तपासकौशल्य दाखवत किराणा दुकानातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे.
दिनांक ०७ मे २०२५ रोजी सकाळी सुमारे १० वाजता फिर्यादी रमेश जवरीलाल बाफना (रा. लक्ष्मीनगर, बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांच्या बार्शी येथील किराणा दुकानात एक अनोळखी इसम खरेदीचा बहाणा करून आला. फिर्यादी यांची नजर चुकवून त्या इसमाने दुकानातील काउंटरजवळ ठेवलेली पैशांची बॅग ज्यामध्ये एकूण ९१,०००/- इतकी रोकड रक्कम होती ती चोरून नेली.
या घटनेवरून बार्शी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४४८/२०२५ भा.दं.सं. कलम ३७९ अंतर्गत अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पोना संगप्पा मुळे यांचेकडे सोपविण्यात आला. गुन्हा नोंदविल्यानंतर पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला आवश्यक त्या सूचना देऊन तपासाचे मार्गदर्शन केले.
त्यानुसार, दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्ष उमाकांत कुंजीर, सोबत पोकॉ राहुल उदार आणि पोकॉ बाळकृष्ण मुठाळ हे उपळाई रोड परिसरात पेट्रोलिंग करत असताना, फिर्यादी यांनी दिलेल्या वर्णनाशी व तपासात मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तीशी साधर्म्य असलेला एक इसम मोटरसायकलवर (सी.बी. झेड) तोंड बांधून संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. पथकाने तत्काळ पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान तो आपले नाव-पत्ता सांगण्यास नकार देत पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला; मात्र पोलिसांनी दक्षता दाखवून त्याला पकडले. पुढील चौकशीत त्यानेच वरील चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
ही यशस्वी कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर, आणि पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण पथकातील प्रमुख पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, पोहेकॉ अमोल माने, प्रविण साठे ,पोकॉ संगप्पा मुळे, बाळकृष्ण मुठाळ, राहुल उदार, अंकुश जाधव, अविनाश पवार, सचिन देशमुख, अजीज शेख, सतीश उघडे, आणि वैभव भांगे यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.















