सीसीटीव्हीच्या मदतीने सासवडवरून आंबेगाव पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सोन्याची रिंग आणि मंगळसुत्राचे मणी दाखवून महिलांचा विश्वास संपादन करत त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरणाऱ्या दोन महिलांना आंबेगाव पोलिसांनी सासवड येथे अटक केली आहे.
अटक केलेल्यांची नावे आशाबेन मंगाभाई सरवय्या (वय ५०) आणि सोनुबेन आकाशभाई सरवय्या (वय ३०, दोघी रा. जुना कोडीत रोड, सासवड, मुळ रा. भावनगर, गुजरात) अशी आहेत. या प्रकरणी भारती योगेश पवार (वय ३५, रा. वसंततारा अपार्टमेंट, संतोषनगर, कात्रज) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १५ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता, कात्रज येथील संतोषनगरमधील ओम किराणा मालाच्या दुकानासमोर घडला.
फिर्यादी या दुकानात असताना दोन्ही महिला तिथे आल्या. त्यांनी सोन्याची रिंग दाखवत “सोनाराकडून याचे किती पैसे मिळतील?” अशी चौकशी केली. ती रिंग खरी सोन्याची असल्याचे दिसून आले. त्यानंतर महिलांनी लाल कागदात सोन्याचे मणी दाखवून फिर्यादींच्या गळ्यातील मंगळसुत्रापेक्षा हे मणी जड असल्याचे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादींनी त्यांना मंगळसुत्र दाखविले. त्या निमित्ताने त्यांनी सुमारे दोन तोळ्याचे मंगळसुत्र चोरून नेले.
घटनेनंतर आंबेगाव पोलिसांनी कात्रज ते सासवड दरम्यानचे ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तपासात या महिला सासवड येथे गेल्याचे उघड झाले. पोलीस अंमलदार प्रमोद भोसले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत संशयितांच्या राहत्या घराची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांच्या पथकाने सासवड येथे धाड टाकून दोघींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख रुपयांचे मंगळसुत्र जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, आणि सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, तसेच पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, ज्ञानेश्वर चित्ते, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, शिवाजी पाटोळे, अजय कामठे, सुभाष मोरे, हरिश गायकवाड, राकेश टेकवडे आणि दीक्षा मोरे यांनी संयुक्तपणे केली.















