वाडेबोल्हाई परिसरातील घटना : स्वयंपाकघराच्या खिडकीतून घरात प्रवेश
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवघरात मांडलेले सोन्याचे दागिने आणि रोकड असा तब्बल १९ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई परिसरात घडली.
या प्रकरणी अमोल काशीनाथ गावडे (वय ३७, रा. वाडेबोल्हाई) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा वाडेबोल्हाई–राहू रस्त्यावर बंगला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (२१ ऑक्टोबर) सायंकाळी त्यांच्या कुटुंबीयांनी नेहमीप्रमाणे पूजा मांडली होती. प्रथेनुसार, दुसऱ्या दिवशी पूजेतील दागिने व रोकड पुन्हा कपाटात ठेवायचे होते.
दरम्यान, मध्यरात्री चोरट्यांनी स्वयंपाकघराच्या खिडकीची जाळी उचकटून घरात प्रवेश केला आणि देवघरात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोकड असा ऐवज चोरून पसार झाले. पाडव्याच्या दिवशी (२२ ऑक्टोबर) सकाळी घरातील सदस्यांनी देवघर उघडले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर गावडे यांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी बंगल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, पोलिस उपनिरीक्षक पालवे पुढील तपास करत आहेत.

 
			



















