पहिला हप्ता स्वीकारताना पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेतील पीएसआयला अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शेअर विकल्याचे भासवून तब्बल ४ कोटी रुपयांची फसवणूक केलेल्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना मदत करण्यासाठी तब्बल २ कोटी रुपयांची लाच मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या २ कोटी रुपयांपैकी पहिला हप्ता स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पिंपरी चिंचवड पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडले.
पोलीस उपनिरीक्षक प्रमोद रवींद्र चिंतामणी (वय ४४, रा. सोपान रेसिडेन्सी, गंगोत्री पार्क, दिघी रोड, भोसरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशीच ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत एका वकिलांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. बाणेर येथे राहणाऱ्या एका कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला तिघा जणांनी आयसीआयसीआय सिक्युरिटीजची बनावट कॉन्ट्रॅक्ट नोट पाठवली.
मार्जिन मनीच्या गुंतवणुकीवर टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स फिर्यादींना विकल्याचे भासविले. त्यांच्याकडून आरोपींनी आपल्या वैयक्तिक बँक खात्यात मार्जिन मनीच्या नावाखाली वेळोवेळी ४ कोटी ९७ लाख ५३ हजार ४२० रुपये स्वीकारले.
सुरुवातीला ९९ लाख २८ हजार ३३७ रुपये परत देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर रक्कम परत न करता ३ कोटी ९८ लाख २५ हजार ८२ रुपयांची फसवणूक केली होती. हा प्रकार १ जानेवारी २०२३ ते ३१ जुलै २०२४ दरम्यान बाणेर येथील कंपनीत घडला होता.
बावधन पोलीस ठाण्यात २१ जून २०२५ रोजी गुन्हा दाखल होऊन त्याचा तपास पिंपरी चिंचवड पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांच्याकडे देण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी आशिलाच्या वडिलांना अटक केली आहे.
या गुन्ह्यामध्ये तक्रारदार वकील यांच्या आशिलाला मदत करण्यासाठी आणि अटक केलेल्या आशिलाच्या वडिलांच्या जामीन अर्जावर ‘से दाखल’ करण्यासाठी प्रमोद चिंतामणी यांनी सुरुवातीला स्वतःसाठी २ लाख रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.
या तक्रारीच्या अनुषंगाने २७ ऑक्टोबर रोजी विभागाने पडताळणी केली असता, प्रमोद चिंतामणी यांनी स्वतःसाठी २ लाखांच्या प्राथमिक लाच मागणीत अचानकपणे वाढ करून २ कोटी रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
स्वतःसाठी आणि त्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपये अशी एकूण २ कोटींची लाच मागण्यात आली होती. या २ कोटी रुपयांपैकी ५० लाख रुपयांचा पहिला हप्ता लवकरात लवकर देऊन उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याचे ठरले होते.
त्यानंतर २ नोव्हेंबर २०२५ रोजी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांनी तक्रारदाराला पहिला हप्ता घेऊन रास्ता पेठेतील उंटाड्या मारुती मंदिरासमोर बोलावले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तेथे सापळा रचला.
पहिल्या हप्त्याच्या ५० लाख रुपयांच्या रकमेपैकी ४६ लाख ५० हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडून स्वीकारताना चिंतामणी यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे अधिक तपास करत आहेत.
घरझडतीत सापडली ५० लाखांची रोकड – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई झाल्यानंतर तातडीने प्रमोद चिंतामणी यांच्या घरात झडती घेतली. त्यात तब्बल ५० लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे. तसेच काही कागदपत्रे व इतर मौल्यवान वस्तू आढळून आल्या असून त्यांची तपासणी सुरू आहे.















