आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मुंबई सायबर क्राईम पोलिसांच्या नावाने महिलेला गंडा

Spread the love

पुणे : मुंबई सायबर क्राईम येथून बोलत असल्याचे सांगून “तुमचे ब्लू डार्ट पार्सल आले आहे, त्यात ड्रग्ज सापडले आहेत” असे सांगून अटक होण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत एका ५८ वर्षांच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला येरवडा परिसरात राहतात. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर गेल्या महिन्यात संपर्क साधला होता.

परदेशातून ब्लू डार्ट या कुरिअर कंपनीद्वारे पाठविलेले पाकीट विमानतळावर जप्त करण्यात आले असल्याचे सांगितले. त्या पाकिटात एटीएम कार्ड, पासपोर्ट, कपडे, लॅपटॉप आणि २०० ग्रॅम एमडीएमए हा अमली पदार्थ सापडल्याचे सांगण्यात आले.

त्यानंतर चोरट्यांनी व्हिडिओ कॉल करून वॉरंटसंबंधी एक लेटर वॉट्सअ‍ॅपवर पाठवले आणि “तुम्हाला पोलीस अटक करणार आहेत” असे भासवले. तक्रारदार महिलेकडून बँक तपशील घेऊन ६ लाख ९५ हजार रुपये पाठविण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक करण्यात आली.

हा प्रकार ७ ते १० ऑक्टोबर २०२५ दरम्यान घडला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान या प्रकरणाचा तपास करत आहेत.