तिघेही अल्पवयीन मुले ताब्यात : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे: दुचाकीवरून जाणाऱ्या दोघा युवकांवर मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी कोयत्याने वार करून त्यातील एका १७ वर्षांच्या युवकाचा निर्घृण खून केला. बाजीराव रोडवर मंगळवारी भरदुपारी झालेल्या या घटनेतील तिघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याची माहिती दिली.
मयंक सोमदत्त खरारे (वय १७, रा. साने गुरुजी नगर, आंबिल ओढा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचा मित्र अभिजित संतोष इंगळे (वय १६, रा. दांडेकर पूल) यालाही कोयत्याचा वार लागून जखम झाली आहे. अभिजित इंगळे याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मयंक खरारे हा मूळचा मंगळवार पेठेत राहणारा आहे. त्याची आई महापालिकेत कामाला आहे. त्यामुळे त्यांना साने गुरुजी नगर येथे खोली मिळाली आहे व तेथे ते राहतात. जुलै महिन्यात जनता वसाहतीतील मुलांबरोबर त्याचे भांडण झाले होते. त्यात मयंक याच्यावर गुन्हा दाखल झाला होता, तर मयंकचा खून करणारा मुख्य अल्पवयीन मुलगा त्यावेळी फिर्यादी होता.
अभिजित इंगळे आणि मयंक खरारे हे दोघे मोपेडवरून मंगळवारी दुपारी सुमारास तीन वाजता मंडईकडे जात होते. त्यावेळी त्यांचे ओळखीचे तिघे जण मोटारसायकलवरून पाठलाग करत आले. महाराणा प्रताप गार्डनजवळील कृष्णकुंज बिल्डिंगसमोर त्यांनी इंगळे यांच्या गाडीला मागून धडक दिली.
मयंक खरारे याच्या तोंडावर, मानेवर व डोक्यावर कोयत्याने ठिकठिकाणी वार केले. मयंकला वाचविण्याचा प्रयत्न करताना इंगळे याच्यावरही वार करून त्याला जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मयंकचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांनी आपली ओळख लपविण्यासाठी तोंडाला मास्क लावले होते.
खडक पोलिसांनी रात्री या तिघाही हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आहे. तिघांना बुधवारी बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे. सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप व्हटकर तपास करीत आहेत.
बाल गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
बाजीराव रोडवरील खुनामध्ये मृत झालेला आणि आरोपी हे सर्वच जण १८ वर्षांखालील असल्याने, गंभीर गुन्ह्यांमधील बाल गुन्हेगारांचा वाढता सहभाग हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वनराज आंदेकर याचा खून करणाऱ्या आरोपीचा भाऊ गणेश काळे याचा कोंढव्यात गोळीबार करून नुकताच खून झाला होता. त्यातील आरोपींवरही ते अल्पवयीन असताना गुन्हे दाखल झाले होते.















