कचरा वेचक महिलांनी पोत्यांमध्ये भरून बंगल्यातील साहित्य चोरून नेले
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मार्केटयार्डमधील ऋतुराज सोसायटीमधील बंद असलेल्या बंगल्यात शिरून काही महिलांनी आतील साहित्य चोरून नेल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला.
याबाबत प्राथमिक माहितीनुसार, ऋतुराज सोसायटीतील बंगला क्रमांक ३२ मध्ये विजय वैद्य राहतात. ते गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून आपल्या मुलीला भेटण्यासाठी परदेशात गेले आहेत. त्यांनी त्यांच्या बंगल्याचे मुख्य गेट उघडे ठेवले होते. शेजाऱ्यांनी हे लक्षात घेऊन त्या गेटला आपले कुलूप लावले होते.
अनेक दिवस बंद असलेला बंगला पाहून सहा महिला आणि मुली मुख्य गेटवरून उड्या मारून आत शिरल्या. त्यांनी बंगल्याच्या आवारातील तसेच हॉलमधील काही साहित्य सहा पोत्यांमध्ये भरले. त्यानंतर त्या पुन्हा मुख्य गेटवरून उड्या मारून बाहेर निघून गेल्या. या घटनेचा व्हिडिओ समोरच्या कोणीतरी काढला.
घटनेची माहिती मिळताच मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बंगल्याची पाहणी केली. बंगल्यातील साहित्य कचरा वेचक महिलांनी चोरून नेल्याचे आढळले. किरकोळ साहित्य तसेच बंगला मालकाने ठेवलेले काही सामान चोरीला गेल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील यांनी सांगितले.

















