‘दृश्यम’प्रमाणे केला खून : वारजे माळवाडी पोलिसांनी केली पतीला अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर वारजे माळवाडी पोलिसांनी केलेल्या तपासात पतीने ‘दृश्यम ३’ फिल्मी स्टाईलने पत्नीचा गळा दाबून खून करून तिचा मृतदेह जाळून राख नदीपात्रात टाकल्याचे निष्पन्न झाले आहे. पत्नीच्या मिसिंगबाबत वारंवार चौकशी केल्याने पोलिसांचा संशय त्याच्याकडे गेला. तपासात समजले की, स्वतःचे अनैतिक संबंध असताना पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्याने तिचा खून केला आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी या पतीला अटक केली आहे.
समीर पंजाबराव जाधव (वय ४२, रा. स्वामी संकुल अपार्टमेंट, शिवणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.याबाबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. समीर जाधव याने पत्नी अंजली समीर जाधव (वय ३८) हिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार २८ ऑक्टोबर २०२५ रोजी वारजे पोलीस ठाण्यात दिली होती.
अंजली २६ ऑक्टोबर रोजी दुपारी वारजे पुलाजवळील बसस्टॉपजवळून बेपत्ता झाल्याचे त्याने सांगितले होते. तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक नितीन गायकवाड यांच्याकडे देण्यात आली होती.
समीर जाधव याला चौकशीसाठी बोलावल्यावर त्याने पत्नी शिंदेवाडी येथील श्रीराम मिसळ हाऊस, गोगलवाडी फाटा येथून बेपत्ता झाल्याचे सांगितले. हे ठिकाण राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पोलिसांनी गुन्हा राजगड पोलीस ठाण्याकडे वर्ग केला.
तरीदेखील पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी वारजे पोलिसांना तपास सुरू ठेवण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे आणि नितीन गायकवाड यांनी तांत्रिक विश्लेषण सुरू ठेवले.
मिसिंग दाखल झाल्यानंतर समीर जाधव वारंवार पोलीस ठाण्यात येऊन “माझ्या पत्नीला कधी शोधणार?” अशी विचारपूस करत होता. त्यामुळे पोलिसांचा संशय त्याच्याकडे गेला. महिला बेपत्ता झाल्याच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि त्याने दिलेल्या माहितीत तफावत दिसून आली.
त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली. वारंवार विचारणा केल्यानंतर अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. समीर जाधव याचे फॅब्रिकेशनचे गॅरेज आहे, तर त्याची पत्नी अंजली जाधव शिक्षिका होती.
समीर जाधव याचे एका महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. त्याने सांगितले की, पत्नीचे सतेज पाटील या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय आला होता. तिच्या मोबाईलवरील चॅटिंगमुळे त्याला शंका आली.
मागील दीड वर्षांत त्यांच्या मध्ये वारंवार वाद होत होते. शेवटी त्याने खून करण्याचे नियोजन आखले. त्याने शिंदेवाडी येथील गोगलवाडी फाटा परिसरात दोन किलोमीटर आत एक गोडाऊन महिन्याला १८ हजार रुपयांनी भाड्याने घेतले.
त्यात लोखंडी बॉक्स आणि दोन पोती लाकूड विकत घेतले. २६ ऑक्टोबर रोजी पत्नी अंजलीला कारने फिरायला जायच्या बहाण्याने खेड-शिवापूरजवळील मरीआई घाट येथे नेले. परतताना शिंदेवाडी येथील एका हॉटेलमधून भेळ विकत घेऊन तिला गोडाऊनमध्ये नेले.
तिथे चटईवर बसून भेळ खात असताना त्याने तिचा गळा दाबून दहा मिनिटांत तिचा जीव घेतला. मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर त्याने तिचे प्रेत लोखंडी बॉक्समध्ये टाकून पेट्रोल ओतून जाळले आणि राख नदीपात्रात टाकून दिली. बॉक्स नंतर स्क्रॅपमध्ये विकून टाकला. त्यानंतर तो पोलीस ठाण्यात जाऊन मिसिंगची तक्रार दिली.
ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे, पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे, निलेश बडाख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, नितीन गायकवाड आणि पोलीस अंमलदार गणेश कर्चे, सुनील मुठे, योगेश वाघ, शरद पोळ, शिरीष गावडे यांनी केली.
पोलीस तपासात अनेक गोष्टी उघड – पोलिसांनी केलेल्या तपासात अंजली जाधव हिच्या चारित्र्यावर समीरने संशय घेतला, पण तिच्या वर्तनात तसे काही आढळून आले नाही. उलट समीर याचेच अनैतिक संबंध होते. त्याने आपल्या गॅरेजमधील कामगाराला हैदराबाद येथे पाठवून सतेज पाटील या नावाने अंजलीशी चॅटिंग करायला लावले होते. त्या कामगाराने “आय लव्ह यू” असा संदेश पाठवला, जो समीरने पकडून पत्नीवर संशय घेतला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून, दोघेही दिवाळी सुट्टीसाठी नातेवाईकांकडे गेले असताना त्याने खून केला. पोलीस उपनिरीक्षक नितीन गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी समीर पंजाबराव जाधव याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करून तो राजगड पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.















