गुन्हे शाखेच्या युनिट ६ ची कामगिरी : ३ घरफोड्या उघड, १८ लाखांचा ऐवज हस्तगत
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार घरी परतल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने धडक कारवाई करत त्याच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केले. चौकशीत तीन घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले असून, तब्बल १८ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.
हंसराज सिंग ऊर्फ हँसू रणजित सिंग टाक (वय १९, रा. तुळजा भवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पथक घरफोडी आणि चोरीच्या घटनांचा तपास करत असताना, हडपसर परिसरात आरोपी हालचाली करत असल्याची गुप्त माहिती पोलिस अंमलदार कानिफनाथ कारखेले आणि नितीन मुंढे यांना ८ नोव्हेंबर रोजी मिळाली.
यानंतर पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून ४१ हजार ४०० रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल, रिकामे मॅगझिन आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकशीत आरोपीने सहकारनगर, चिखली आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील ३ घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एकूण १५५ ग्रॅम वजनाचे, १७ लाख ८१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, असा एकूण १८ लाख २२ हजार २०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. अधिक तपासासाठी आरोपीला हडपसर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, आणि सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, तसेच पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, सचिन पवार, निर्णय लांडे, नेहा तापकीर, ऋषिकेश ताकवणे, नितीन धाडगे, ऋषिकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे आणि सोनाली नरवडे यांनी केली.















