मौजमजेसाठी बाळगले होते शस्त्र : खंडणीविरोधी पथकाची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कोणत्याही गुन्हेगारीशी संबंध नसतानाही दोन तरुणांकडे गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले आहे. चौकशीत त्यांनी हे शस्त्र फक्त मौजमजेसाठी बाळगल्याचे सांगितले. मात्र आता चांगली नोकरी करणाऱ्या या दोघांवर गुन्ह्याचा शिक्का बसला आहे.
अटक केलेल्यांची नावे रवींद्र लक्ष्मण रसाळ (वय २१, सध्या रा. सदाशिव पेठ, मुळगाव – चिरेमोडी, पो. गुंजवणे, ता. वेल्हा) आणि अथर्व अभिमन्यू शेजवळ (वय २०, रा. शिवांशु अपार्टमेंट, आंबेगाव पठार) अशी आहेत. हे दोघेही सदाशिव पेठेतील मेडिकलच्या दुकानात नोकरी करतात.
त्यांनी सुमारे सहा महिन्यांपूर्वी मौजमजेसाठी पिस्तूल विकत घेतले होते आणि त्यासोबतचे फोटो काढले होते. त्याच फोटोंमुळे ते पोलिसांच्या नजरेत आले. त्यांना पिस्तूल विकणारा व्यक्ती सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
खंडणीविरोधी पथकातील पोलीस अंमलदार मयुर भोकरे व मंगेश गुंड यांना ९ नोव्हेंबर रोजी बातमीदारांकडून माहिती मिळाली की, रवी रसाळ याच्याकडे गावठी पिस्तूल असून तो नदीपात्रात, वर्तक बागेच्या मागील बाजूस आला आहे. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांना कळविण्यात आली. वरिष्ठांच्या परवानगीने पथकाने तत्काळ कारवाई केली.
पोलिसांनी वर्तक बाग परिसरात जाऊन रवी रसाळ याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पिस्तूल सापडले नाही. चौकशीत त्याने पिस्तूल अथर्व शेजवळ याच्याकडे ठेवण्यास दिल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आंबेगाव पठार येथील त्याच्या घरावर छापा टाकून अथर्वला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना पुढील चौकशीसाठी भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, तसेच अमोल आवाड, दुर्योधन गुरव, बाला रफी शेख, रहिम शेख, मयुर भोकरे आणि मंगेश गुंड यांनी केली.















