लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची केडगावमध्ये कारवाई : तलाठी अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : विकत घेतलेल्या जमिनीच्या संगणकीय ७/१२ उताऱ्यावर झालेली नोंद चूक दुरुस्त करण्यासाठी ४ लाख रुपयांची लाच मागून तडजोडीअंती २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठीस रंगेहात पकडले.
दीपक नवनाथ आजबे (वय ३९, रा. आनंद हेरिटेज, केडगाव स्टेशन, मूळ रा. खापर पांघरी, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव असून, तो दौंड तालुक्यातील देलवडी सजा येथील तलाठी म्हणून कार्यरत आहे.
तक्रारदार शेतकऱ्यांनी २०१२ साली देलवडी येथे ०.०६ आर क्षेत्रफळाची जमीन विकत घेतली होती. त्याची नोंद महसूल दप्तरी ७/१२ उताऱ्यावर त्यांच्या नावावर झाली होती. मात्र, जुलै २०२४ मध्ये संगणकीय ७/१२ उतारा काढला असता त्यावर चुकीने ०.०६ आर ऐवजी ०.०३ आर क्षेत्र नोंदवलेले दिसून आले.
यानंतर तक्रारदारांनी ७ ऑगस्ट २०२४ रोजी संबंधित दुरुस्ती करण्यासाठी तलाठी दीपक आजबे यांच्याकडे लेखी अर्ज केला. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी आजबे यांची भेट घेतली असता, त्यांनी काम करून देण्याचे आश्वासन दिले. सप्टेंबर २०२५ मध्ये तलाठ्याने संगणकीय ७/१२ वर दुरुस्ती करण्यासाठी तक्रारदाराकडून हस्तलिखित उताऱ्याची प्रत मागवून घेतली. ती तहसीलदार कार्यालयातून प्राप्त करून तक्रारदारांनी तलाठीस दिली.
यानंतर तलाठ्याने दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून तहसीलदारांकडे पाठविण्यासाठी ४ लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने ६ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार ७ व १० नोव्हेंबर रोजी पडताळणी करण्यात आली.
७ नोव्हेंबर रोजीच्या पडताळणीत तलाठ्याने ३ लाख रुपयांची मागणी करून अडीच लाख स्वीकारण्याची तयारी दर्शवली. पुढे १० नोव्हेंबर रोजी तडजोडीअंती २ लाख रुपयांची मागणी निश्चित करण्यात आली.
यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. केडगाव चौफुला येथील साईराज कॅन्टीनमध्ये तक्रारदाराकडून २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता तलाठी दीपक आजबे याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, व अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे आणि अंमलदार पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे करीत आहेत.















