महिलेची सव्वा दोन लाखांची फसवणूक : विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : हॉटेलमधील खोली ऑनलाइन पद्धतीने आरक्षित करणे एका महिलेला महागात पडले. चोरट्यांनी महिलेच्या क्रेडीट कार्डची गोपनीय माहिती घेऊन बँक खात्यातून २ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३८ वर्षाच्या महिला श्री जोगेश्वर मंदिर परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. महिलेला परगावी जायचे होते. त्यामुळे तिने ऑनलाइन पद्धतीने हॉटेलमधील खोली आरक्षित करण्याचे निश्चित केले. संकेतस्थळावर असलेल्या मोबाइल क्रमांक महिलेने घेतला.
संकेतस्थळावरील मोबाइल क्रमांकात फेरफार करुन सायबर चोरट्यांनी स्वत:चा मोबाइल क्रमांक टाकला होता. महिलेने मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा चोरट्यांनी महिलेच्या क्रेडीट कार्डची गोपनीय माहिती घेतली.
या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी महिलेच्या खात्यातून २ लाख ३८ हजार रुपयांची रक्कम लांबविली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक अरुण घोडके तपास करत आहेत.
गुंतवणुकीच्या आमिषाने ५७ लाखांची फसवणूक
गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची ५७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी संपर्क साधला. शेअर बाजारासह वेगवेगळ्या गुंतवणूक योजनांची माहिती चोरट्यांनी त्यांना दिली. गुंतवणुकवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. त्यानंतर तक्रारदाराने वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात ५७ लाख १३ हजार रुपये जमा केले. चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत.















