शिवाजीनगर पोलिसांची कारवाई : आर्म अॅक्टखालीही दाखल गुन्हा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शिवाजीनगर रेल्वे कॉटर्स येथे तरुणावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
अभिषेक गणेश दोरास्वामी (वय १९, रा. प्लॉट क्र. ११, शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळ) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिसांनी ६ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास काँबिंग ऑपरेशन सुरू केले होते. त्या वेळी शिवाजीनगर मेट्रो स्टेशनसमोर एका कारमध्ये तीन जण बसलेले आढळले.
पोलिसांना पाहताच अभिषेक दोरास्वामी पळून गेला. मात्र, पोलिसांनी त्याचे साथीदार रोनीत राजेश संगे आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून कोयता आणि कार जप्त केली. या प्रकरणी आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर ११ नोव्हेंबरला रात्री पावणे बारा वाजता शिवाजीनगर रेल्वे कॉटर्स परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून अभिषेक दोरास्वामी आणि त्याच्या साथीदारांनी अजय अलगुडे याच्यावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. या घटनेचा गुन्हा खडकी पोलीस ठाण्यात दाखल आहे.
दरम्यान, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे अंमलदार पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार सचिन जाधव आणि श्रीकृष्णा सांगवे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अभिषेक दोरास्वामी हा त्याच्या राहत्या घराजवळ आला आहे.
ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना देण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचून अभिषेकला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याला आर्म अॅक्टखाली अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले आणि सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस हवालदार दीपक चव्हाण, राजकिरण पवार, सचिन जाधव, सुदाम तायडे आणि श्रीकृष्णा सांगवे यांनी केली.















