फ्लॅटसह एका हॉटेलवर भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरातील एका फ्लॅटमध्ये हुक्का पार्लर चालवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या फ्लॅटसह तेथील ‘रूट २४’ हॉटेलमधील हुक्का पार्लरवर भारती विद्यापीठ पोलिसांनी कारवाई केली आहे.
या प्रकरणी सौरभ प्रकाश फडके (वय २७, रा. आसावरी कुंज अपार्टमेंट, नवले पूलजवळ, वडगाव बुद्रुक), प्रीतम अरुण कोयले (वय ३२, रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर, आंबेगाव, कात्रज) आणि प्रतीक जयंत गोळे (वय ३४, रा. गुरुवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस हवालदार मंगेश पवार यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई पोलिसांनी १६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरातील एका इमारतीतील फ्लॅटमध्ये हुक्का पार्लर चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने ‘पायगुडे’ इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटवर छापा टाकला. तेथे सौरभ फडके आणि प्रीतम कोयले हे आर्थिक फायद्यासाठी विविध फ्लेवर्सचा हुक्का ग्राहकांना सेवनासाठी देत असल्याचे आढळले.
तसेच सिंहगड कॅम्पस येथील ‘रूट २४’ हॉटेलमध्येही हुक्का पार्लर सुरु असल्याचे दिसून आले. पोलिसांनी प्रतीक गोळे हा हॉटेलमध्ये हुक्का पुरवत असल्याचेही आढळले. या कारवाईत हुक्का पात्रे, सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते, पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, पोलीस अंमलदारांनी केली आहे.
















