सायबर चोरट्यांना देत होता बँक खाते वापरण्यासाठी : सायबर पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फसवणुकीत सायबर चोरट्यांना पैसे स्वीकारण्यासाठी बँक खाते उपलब्ध करून देणाऱ्या निगडी प्राधिकरणातील एका व्यक्तीस सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
अटक केलेल्या आरोपीचे नाव अरविंद बाबुलालजी लोढा (वय ५५, रा. टेल्को हौसिंग सोसायटी, सेक्टर २४, निगडी प्राधिकरण; सध्या रा. अंजिक्यतारा सोसायटी, सेक्टर २७, निगडी प्राधिकरण) असे आहे. फिर्यादींना ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये अधिक परताव्याचे आमिष दाखवून एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले.
संबंधित व्यक्ती कंपनीचे एजंट असल्याचे भासवले गेले. विविध कंपन्यांचे शेअर्स व आयपीओ खरेदी करण्याच्या नावाखाली फिर्यादींकडून ७३ लाख ६९ हजार ३९२ रुपये विविध बँक खात्यांमध्ये जमा करून घेण्यात आले आणि त्यांची फसवणूक झाली.
तपासादरम्यान या रकमेपैकी ३० लाख ८४ हजार ४९९ रुपये हे १० व्यवहारांतून उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेतील एका खात्यात जमा झाल्याचे समोर आले. हे खाते सुरज ट्रेडलाईन या नावाने असून खातेधारक अरविंद लोढा असल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरून पोलिसांनी माहिती गोळा करून १९ नोव्हेंबर रोजी निगडी प्राधिकरणातील सेक्टर २४मधील हनुमान मंदिराजवळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. गुन्ह्यात त्याचा सहभाग स्पष्ट झाल्याने त्याला अटक करण्यात आली. अंगझडतीत आरोपीकडून दोन मोबाईल फोन व तीन डेबिट कार्ड जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संगिता देवकाते करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे व पोलीस निरीक्षक संगिता देवकाते यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार संदेश कर्ण, राजुदास चव्हाण, अमर बनसोडे, प्रविणसिंग राजपूत, सचिन शिंदे, अनिकेत भिंगारे, शितल डांगे, आनंद भंडलकर, रवि राठोड व मरकड यांनी केली.
सायबर चोरट्यांपासून सावधान
डिजिटल अरेस्ट, ऑनलाईन शेअर ट्रेडिंग, फेडेक्स पार्सल, पार्सलमध्ये ड्रग्ज अशा विविध पद्धतींनी सायबर फसवणुकीचे प्रकार वेगाने वाढत आहेत. जादा परतावा, अटकेची भीती अशा आमिषांना बळी पडू नये. फसवणुकीची शंका आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधून खातरजमा करावी. ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधावा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.















