लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एकाच दिवसात दोन कारवाया
पुणे : सहशिक्षिकेचा शालार्थ आयडी मंजूर करण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या शिक्षण उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सायंकाळी रंगेहात पकडले.
रावसाहेब भगवान मिरगणे (वय ५७, रा. ग्रीनव्हील सोसायटी, डी. पी. रोड, मावळा हॉटेलजवळ, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षण उपनिरीक्षकाचे नाव आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच दिवशी दोन लाचखोरांना गजाआड केले आहेत.
वाघोली पोलीस ठाण्याच्या आवारात सकाळी पोलीस हवालदार परमेश्वर पाखरे याला ५ हजार रुपयांची लाच घेताना पकडले होते. त्यानंतर सायंकाळी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात सापळा रचून दुसरी कारवाई करण्यात आली.
तक्रारदार यांची पत्नी सोलापूर जिल्ह्यातील एका माध्यमिक शाळेत सहशिक्षिका म्हणून नोकरीला आहेत. त्यांना शालार्थ आयडी नसल्याने त्या २०१६ पासून विनावेतन काम करत आहेत. शालार्थ आयडी मंजूर झाल्यानंतर त्यांना वेतन सुरू होणार होते.
शालार्थ आयडी मंजूर करण्यासाठी तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीचा प्रस्ताव १६ जून २०२५ रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात दाखल केला होता. हा प्रस्ताव ई-ऑफिसमार्फत विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे सादर करून मंजूर करण्यासाठी या कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे यांनी १ लाख रुपयांची लाच मागितली.
ही तक्रार १७ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली. या तक्रारीची पडताळणी १७ आणि २१ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आली. त्यात रावसाहेब मिरगणे यांनी १ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून आपल्या केबिनमध्ये १ लाख रुपये स्वीकारताना रावसाहेब मिरगणे यांना पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. सहायक पोलीस आयुक्त सतीश वाळके अधिक तपास करीत आहेत.
महिलेकडे लाच मागणारा हवालदार जाळ्यात –
पोटगीबाबत न्यायालयाने दिलेले वॉरंट पतीवर बजावण्यासाठी ५ हजारांची लाच मागणाऱ्या वाघोली पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार परमेश्वर माणिक पाखरे (वय ३७, रा. गणेशनगर, आव्हाळवाडी, वाघोली) याला सापळा रचून पकडण्यात आले.
तक्रारदार ही मुळची सांगली जिल्ह्यातील विटा येथील रहिवासी आहे. तिचे पतीसोबत पटत नसल्याने तिने २०१५ मध्ये पोटगीसाठी विटा न्यायालयात दावा दाखल केला होता. त्या दाव्यामध्ये ऑक्टोबर २०२४ मध्ये न्यायालयाने तक्रारदारांच्या बाजूने निकाल देऊन २०१५ पासून प्रतिमहिना ५ हजार रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले.
परंतु तक्रारदाराच्या पतीने पोटगी दिली नसल्याने तिने पुन्हा संबंधित कोर्टात अर्ज दाखल केला. कोर्टाने तक्रारदाराच्या पतीच्या नावावर थकीत पोटगीची ६ लाख ६५ हजार रुपयांची रक्कम वसुल करण्यासाठी जप्ती व विक्रीचे वॉरंट जारी केले.
हे वॉरंट तक्रारदाराने स्वतः वाघोली पोलीस ठाण्यात आणून दिले. वॉरंट बजावून रिपोर्ट देण्यासाठी पाखरे यांनी तक्रारदार महिलेची ५ हजार रुपयांची लाच मागणी केली. वारंवार मागणी करून लाच न दिल्यास वॉरंट बजावणार नसल्याची धमकी दिल्याने तक्रारदार महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.
तक्रारीच्या पडताळणीसाठी २५ नोव्हेंबर रोजी वाघोली पोलीस ठाण्याच्या परिसरात तपास करण्यात आला. त्यात रिकव्हरी वॉरंटची बजावणी करून रिपोर्ट देण्यासाठी ५ हजारांच्या लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर मंगळवारी दुपारी १२ वाजता वाघोली पोलीस ठाण्याजवळ सापळा रचण्यात आला. तक्रारदार महिलेकडून चहाच्या टपरीवर ५ हजार रुपयांची लाच घेताना परमेश्वर पाखरे यांना रंगेहात पकडले. वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
















