अंमली पदार्थ विरोधी पथकाची वाघोलीमध्ये राजस्थानी गुन्हेगारावर कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : अंमली पदार्थाचे व्यसन लागलेल्या एका राजस्थानी तस्कराला पकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्याकडून ११ लाख १० हजार रुपयांचे ५१ ग्रॅम ५० मिलिग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त केले आहे.
लेखाराम धर्मराज चौधरी (वय २७, रा. केसनंद-वाघोली रोड, चिरायु हॉस्पिटलच्या इमारतीच्या मागे, वाघोली) असे या तस्कराचे नाव आहे.अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि त्यांचे सहकारी वाघोली परिसरात २९ नोव्हेंबर रोजी पेट्रोलिंग करत होते.
दरम्यान, पोलीस अंमलदार संदीप देवकाते यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वाघोली रोडवरील मंथन कॉम्प्लेक्स येथून लेखाराम चौधरी याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ११ लाख १० हजार रुपयांचे ५१ ग्रॅम ५० मिलिग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) मिळून आले.
लेखाराम चौधरी याच्या भावाचे किराणा दुकान आहे. गेल्या ४ वर्षांपासून लेखाराम पुण्यात राहत आहे. त्याला स्वतःला अंमली पदार्थांचे व्यसन लागले असून तो गावाकडून अंमली पदार्थ मागवून त्याची विक्री करतो.
आलेल्या पैशातून तो आपले व्यसन भागवत असतो. वाघोली पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध एन.डी.पी.एस. अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितिनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड, पोलीस अंमलदार संदीप जाधव, दत्तात्रय खरपुडे, पृथ्वीराज पांडुळे, संदीप देवकाते, देविदास वांढरे, महेश बोराडे, शुभांगी म्हाळसेकर यांनी केली आहे.
















