सूर्यदत्त फिजिओथेरपी इन्स्टिट्यूटतर्फे वाहतूक पोलिसांसाठी दोन दिवसीय ‘फुफ्फुस आरोग्य अभियान’
महाराष्ट्र जैन वार्ता
पिंपरी : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स – कॉलेज ऑफ फिजिओथेरपी (SIHS-COP) तर्फे पुण्याच्या विविध भागांमध्ये दोन दिवसीय क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) जनजागृती आणि फुफ्फुस आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
वाढत्या प्रदूषणाच्या परिस्थितीत वाहतूक पोलीस दिवसेंदिवस धूर, धूळ आणि वाहनांच्या उत्सर्जनाला सामोरे जातात. त्यामुळे त्यांच्या श्वसन आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. या उपक्रमाचा उद्देश वाहनांच्या धुराच्या उत्सर्जनामुळे आणि पर्यावरणीय प्रदूषणामुळे दीर्घकाळ बाहेर ड्युटी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना उद्भवणाऱ्या श्वसनविकारांच्या धोक्याकडे लक्ष वेधणे हा होता.
या दोन दिवसांत एकूण 102 वाहतूक पोलिसांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. फिजिओथेरपी टीमने सर्वसाधारण श्वसन तपासणी तसेच पीक एक्स्पायरेटरी फ्लो रेट (PEFR) चाचणी करून फुप्फुसांची कार्यक्षमता आणि हवेच्या प्रवाहातील अडथळे तपासले.
याच सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरांतर्गत वाकड ट्रॅफिक पोलीस चौकी आणि एसपी हायवे ट्रॅफिक ऑफिस, बावधन येथे वाहतूक पोलिसांची विविध शारीरिक व श्वसनविषयक तपासणी करण्यात आली.
पोलिस कर्मचाऱ्यांना सीओपीडीबाबत जनजागृती, लक्षणे ओळखण्याचे मार्गदर्शन, फुफ्फुस कार्यक्षमता तपासणी तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सूचना देण्यात आल्या. हा उपक्रम वाहतूक पोलीस दलाच्या आरोग्य संवर्धनासाठी सूर्यदत्त समूहाच्या सामाजिक बांधिलकीचे प्रत्यक्ष प्रतीक ठरला.
पोलिस कर्मचाऱ्यांना सीओपीडीचे कारणे, सुरुवातीची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय याबाबत संवाद, प्रात्यक्षिके आणि माहितीपत्रकांद्वारे मार्गदर्शन केले. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ड्युटीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना संरक्षक फेस मास्कचे वितरण करण्यात आले आणि त्यांचा योग्य वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन देण्यात आले.
तसेच श्वसन व्यायाम, पुरेशी पाण्याचे सेवन, आरोग्यदायी जीवनशैली आणि फुप्फुसांचे रक्षण करण्याच्या तंत्रांचीही माहिती देण्यात आली. या उपक्रमाच्या आयोजनामागे सूर्यदत्त शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन महत्त्वपूर्ण ठरले.
समाजाच्या आरोग्यवर्धनासाठी आवश्यक असलेल्या जनजागृती उपक्रमांना ते नेहमीच समर्थन देत असून, अशा सामुदायिक उपक्रमांबाबत त्यांची दूरदृष्टी टीमसाठी प्रेरणादायी ठरते. संस्थेच्या आरोग्यविषयक सर्व उपक्रमांना उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया आणि सह-उपाध्यक्षा स्नेहल नवलखा यांनीही सक्रिय पाठिंबा, समन्वय आणि आवश्यक मार्गदर्शन दिल्यामुळे हा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवता आला.
एसपी हायवे ट्रॅफिक ऑफिस येथे अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी या उपक्रमाचे कौतुक केले, पोलिस कर्मचाऱ्यांना नियमितपणे मास्क वापरण्याचे व श्वसन व्यायाम करण्याचे आवाहन केले आणि संस्थेचे आभार मानले. उपनिरीक्षक डॉ. राजेश मोरे यांनी उपक्रमाच्या सुरळीत आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
वाकड ट्रॅफिक पोलीस चौकी येथे एपीआय माधव थोरात, पीएसआय रोहित दिवटे, एपीएसआय नवनाथ खेड़कर व पोलीस नाईक शेखर बविस्कर यांनी उपक्रमात पूर्ण सहकार्य केले. त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना नियमित मास्क वापरणे, तंदुरुस्ती राखणे आणि शिकवलेले श्वसन व्यायाम अवलंबण्यास प्रोत्साहित केले.
या आरोग्यवर्धक आणि अत्यावश्यक उपक्रमासाठी SIHS-COP चे त्यांनी मन:पूर्वक आभार मानले. या प्रसंगी SIHS-COP चे प्राचार्य डॉ. सीमि रेथारेकर यांनी सीओपीडीविषयी मार्गदर्शन केले, सोपे श्वसन व्यायाम, जीवनशैलीत बदल व फुप्फुस निरोगी ठेवण्याचे उपाय शिकवले.
हा उपक्रम कार्डिओव्हॅस्क्युलर-रेस्पिरेटरी फिजिओथेरपी विभागाचे विभागप्रमुख व प्राध्यापक डॉ. राजकिरण टिकू, डॉ. श्रीधर श्रीरोडकर आणि सहाय्यक प्राध्यापक डॉ. मानसी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.
अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी तपासण्या, प्रात्यक्षिके व जनजागृती कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. वाहतूक पोलिसांनी या उपक्रमाचे कौतुक करत, वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर अशा आरोग्य तपासणी आणि जनजागृती कार्यक्रमांची वेळेवरची गरज असल्याचे सांगितले.
त्यांनी आपल्या दैनंदिन कर्तव्यात श्वसन आरोग्याची किती महत्त्वाची भूमिका आहे, याची जाणीव या उपक्रमामुळे अधिक स्पष्ट झाली असल्याचेही व्यक्त केले. या माध्यमातून सूर्यदत्तचे सार्वजनिक आरोग्य संवर्धन आणि प्रतिबंधात्मक फिजिओथेरपीच्या प्रसारासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न अधोरेखित झाले.
सूर्यदत्त भविष्यातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांच्या माध्यमातून अग्रिम पंक्तीतील कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी कार्यरत राहील आणि दीर्घकालीन श्वसन आजारांबाबत जनजागृती वाढविण्यासाठी सातत्याने उपक्रम राबवत राहील अशी हमी डॉ चोरडिया यांनी दिली.
















