पोक्सोच्या गुन्ह्यात अडकविण्याची दिली धमकी : भारती विद्यापीठ पोलिसांनी तरुणीसह तिच्या साथीदारांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर तरुणीने भुगाव येथील तरुणाला कात्रज घाटात भेटायला बोलावून साथीदारांच्या मदतीने धमकावले. पोक्सोचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत भुगाव येथील एका २८ वर्षांच्या तरुणाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अक्षय शेलार, राहुल शितोळे, ऋषिकेश सुरते, एक तरुणी आणि इन्स्टाग्राम अकाऊंट धारकावर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार ७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री आठ वाजता कात्रज घाट–येवलेवाडी परिसरात घडला.भुगाव येथील तरुणाची राधिका नावाच्या तरुणीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यांच्या चॅटिंगनंतर काही दिवसांत जवळीक निर्माण झाली.
या तरुणीने फिर्यादीला कात्रज चौकात भेटायला बोलावले. भेटल्यानंतर तिने बाईक कात्रज घाटाकडे घेऊन जाण्यास सांगितले. जात असताना एका ठिकाणी तिने त्याला थांबवायला सांगितले. त्याने बाईक थांबवल्यावर, तेथे लपून बसलेले तिचे साथीदार अचानक समोर आले.
त्यांनी त्याला धमकावून येवलेवाडी परिसरात नेले. त्याला शिवीगाळ करून मारहाण केली आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसे न करण्यासाठी ७० हजारांची खंडणी मागितली. मात्र, फिर्यादीकडे इतकी रक्कम नसल्याने शेवटी त्याच्याकडून १० हजार रुपये घेऊन त्याची सुटका केली.
त्यानंतर उर्वरित खंडणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून ते त्याला सतत फोन करत होते. अखेर त्याने मंगळवारी रात्री भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सहायक पोलिस निरीक्षक स्नेहल थोरात तपास करीत आहेत.















