वडगाव शेरीतील कारखाना पाडून मशिनरी चोरी : जागेचा बेकायदेशीर ताबा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वडगाव शेरी येथील गीताबाई चाळ येथील जागेचा रात्री ११ वाजता बेकायदेशीर ताबा घेताना तेथील कारखाना व गॅरेज पाडून त्यामधील सुमारे ७० लाख ९० हजार रुपयांची मशिनरी व कच्चा माल चोरी करून नेल्याप्रकरणी ब्रम्हा कॉर्पच्या संचालकांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ब्रम्हा कॉर्प लिमिटेडचे करण अगरवाल, अजय अगरवाल, हिमांशु अगरवाल, श्रीनिवास रेड्डी, दत्ता चव्हाण, इसरार खान, संजय सिंग, रवी लुडकत तसेच इतर कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १५ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११ वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपतराव गुलाबराव पासलकर (रा. इच्छापूर्ती सोसायटी, गणेशनगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. गीताबाई चाळ येथे ‘ग्रीन स्टार इंजिनिअरिंग वर्क्स’ नावाचा कारखाना १९८० पासून सुरू होता.
हा कारखाना त्यांनी दत्तु गलांडे यांच्याकडून भाड्याने घेतला होता. या कारखान्यात शीट मेटल प्रेस पार्ट्स, डाईज व जिग-फिक्चरचे काम केले जात होते. कारखान्यात सुमारे ७० लाख ९० हजार रुपयांची मशिनरी व कच्चा माल होता.
१५ ते २० जानेवारी २०२६ या कालावधीत ब्रम्हा कॉर्पच्या लोकांनी कारखाना पाडून जागा पूर्णपणे जमीनदोस्त केली आणि त्यातील मशिनरी चोरी करून नेली. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, १५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता पोकलेन मशीन घटनास्थळावरून बाहेर जाताना तसेच ८ ते १० कामगार लोखंडी पत्र्यांचे कंपाऊंड करताना दिसून आले.
याच जागेवर मुमताज रियाज शेख (वय ६२, रा. कामराजनगर, येरवडा) यांचे ‘रियाज ऑटो वर्क्स’ नावाचे गॅरेज गेल्या ३५ वर्षांपासून सुरू होते. १६ जानेवारी रोजी ब्रम्हा बिल्डर्सने हे गॅरेज तोडून त्यातील सर्व साहित्य बाहेर फेकून दिले. हे साहित्य त्यांचे पुत्र सुलतान शेख यांनी घरी नेले.
या जागेचे मूळ मालक धनंजय दत्तात्रय गलांडे (वय ५०, रा. गीताबाई चाळ, सैनिकवाडी, वडगाव शेरी) यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, ही जागा पूर्वी शेतीची होती व २०२४ मध्ये ब्रम्हा बिल्डर्सना ‘जैसे थे’ स्थितीत विकली होती. या जागेतील भाडेकरू कोणताही मोबदला देत नव्हते. तसेच संपतराव पासलकर यांचा कारखाना मागील १० ते १२ वर्षांपासून बंद होता, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, ब्रम्हा बिल्डर्सच्या कार्यालयातील संजय दयानंद औसरमल (वय ४२, रा. रमाबाईनगर, पिंपरी) यांनी पोलिसांना सांगितले की, गलांडे यांच्याकडून ब्रम्हा बिल्डर्सने ही जागा १२ नोव्हेंबर २०२५ रोजी विकत घेतली आहे. मात्र, बांधकाम पाडण्यासाठी त्या ठिकाणच्या भाडेकरूंची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती.
सर्व चौकशीनंतर, गीताबाई चाळ येथील जागेतील भाडेकरू सुशीला संपतराव पासलकर व मुमताज शेख हे आपला कारखाना व गॅरेज व्यवसाय सुरू असताना, त्यांच्या संमतीशिवाय तसेच कोणत्याही न्यायालयीन आदेशाशिवाय ब्रम्हा कॉर्पच्या संचालकांच्या सांगण्यावरून कारखाना व गॅरेज पाडून मशिनरी चोरी करून जागेचा बेकायदेशीर ताबा घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे करीत आहेत.















